आगीच्या घटनांचे सत्र सुरू झाल्यानंतर देवनार कचराभूमीलगतची झोपडपट्टी हटविण्यासाठी आणि संरक्षक भिंत उभारण्यासाठी पुढाकार घेणारे एम-पूर्व विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आता दिघावकर यांच्याकडे पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तपदाची सूत्रे देण्यात आली आहेत.
देवनार कचराभूमीला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत होत्या. कचराभूमीत कार्यरत असलेल्या माफियांना वेसण घालण्यासाठी लगतच्या झोपडय़ा तोडण्यासाठी, तसेच कचराभूमीभोवती संरक्षक भिंत बांधण्यासाठी किरण दिघावकर यांनी पुढाकार घेतला होता. त्याचबरोबर ‘अपनालय’सह अन्य सामाजिक संस्थांशी संपर्क साधून त्यांनी कचरा वेचकांसाठी शिबिरांचे आयोजन करण्यास सुरुवात केली होती. मात्र कचराभूमीतील आगीच्या घटनांना आळा बसताच किरण दिघावकर यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. आता त्यांच्याकडे ‘ए’ विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. त्याचबरोबर ‘बी’ विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांची ‘एम-पूर्व’ विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. ‘सी’ विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्त सत्यप्रकाश सिंग यांची नगर अभियंता खात्यात बदली करण्यात आली असून घनकचरा विभागातील कार्यकारी अभियंता उदयकुमार शिरुरकर यांना बढती देऊन ‘बी’ विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच स्थापत्य विभागातील कार्यकारी अभियंता जीवक घेगडमल यांची ‘सी’ विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.