मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयात भाजपची सत्ता आल्यापासून भाजपच्या नेत्यांची, आमदार, खासदारांची, माजी आमदार, खासदारांची वर्दळ वाढली आहे. माजी खासदार किरीट सोमय्या हे देखील पालिकेशी संबंधित विविध प्रकरणांसाठी पालिकेच्या मुख्यालयात येत असतात. बुधवारी जन्म मृत्यू प्रमाणपत्र घोटाळ्याचा आढावा घेण्यासाठी किरिट सोमय्या पालिका मुख्यालयातील महापौर दालनात आले होते. मात्र बैठकीनंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच पत्रकारांवर रागावून अचानक किरीट सोमय्या निघून गेले. त्यांच्याबाबतचा हा किस्सा पालिका वर्तुळात चांगलाच चर्चेत आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणावर बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचे आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. याबाबत त्यांनी पालिका प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला आहे. याच प्रश्नावर आढावा बैठक घेण्यासाठी किरीट सोमय्या हे पालिका मुख्यालयात आले होते. मात्र बैठकीत काय घडले हे सांगण्यापूर्वीच ते पत्रकारांवर संतापून निघून गेले.
माझा बाईट आधी घ्या….
मुंबई महापालिका मुख्यालयातील महापौरांचे दालन बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल बुधवारी सकाळीच पालिका प्रशासनाला आला होता. त्यामुळे सर्वच प्रसारमाध्यमांचे लक्ष या वृत्ताकडे लागले होते. या धमकीच्या अनुषंगाने महापौरांची प्रतिक्रिया मिळवण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी पालिका मुख्यालयातील महापौर दालनाबाहेर थांबले होते. याचवेळी महापौरांकडे जन्म प्रमाणपत्राबाबतची आढावा बैठक सुरू होती. या बैठकीला किरिट सोमय्याही उपस्थित होते.
बैठक संपेपर्यंत प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी महापौर दालनाबाहेर वाट बघत उभे होते. बैठक संपताच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी कॅमरासह दालनात गेले. महापौरांसमोर कॅमरे आणि माईक लावत असतानाच किरीट सोमय्या यांनी ‘माझा बाईट आधी घ्या’ म्हणून पत्रकारांना फर्मान सोडले. मात्र पत्रकारांनी महापौरांसमोरचे माईक हटवले नाहीत. त्यामुळे किरीट सोमय्या आणि पत्रकार यांच्यात वादावादी झाली.
महापौरांनी किरीट सोमय्या यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पत्रकारांनी महापौरांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. त्यामुळे अपमानित झालेले सोमय्या तिथून रागावून निघून गेले. त्यांच्या हा हट्ट प्रसारमाध्यमांच्या कॅमेरात मात्र बंदिस्त झाला.
किरिट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून पालिकेशी संबंधित विविध विषयांवर प्रसारमाध्यमांवर बोलताना दिसतात. मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहातील अनियमितता, अंधेरी क्रीडा संकुलातील अनियमितता या विषयांवर त्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षावर विविध आरोप वृत्तवाहिन्यावर केले आहेत. त्यामुळे या विषयावरही आधी आपलाच बाईट वृत्तवाहिन्या घेतील अशी सोमय्या यांना अपेक्षा होती. मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला.
