scorecardresearch

“संजय राऊत तुमच्यात किंवा ‘माफियासेना’मध्ये जर हिंमत असेल तर…”; किरीट सोमय्या यांचं खुलं आव्हान!

“संजय राऊत करोना काळात किती कोटी रुपयांचा व्यवहार केला?” असा सवाल देखील केला आहे.

Sanjay raut and Kirit Somayaa
किरीट सोमय्या आणि संजय राऊत (संग्रहीत छायाचित्र)

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज (मंगवळवार) मुंबई भाजपा कार्यालायात आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना शिवसेना नेते संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविडचा धंदा केला, असा गंभीर आरोपही यावेळी त्यांनी केला.

“उद्धव ठाकरे यांची माफिया सेना केवळ हेच काम करते. घरात घुसून नेव्ही अधिकाऱ्याला मारतात. घरात घुसून लोकाना घेऊन जातात. माफियागिरी करतात आणि चोरी, लबाडी पकडली गेली. तर त्याचं उत्तर देण्याची संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत नाही. संजय राऊत तुमच्यात किंवा ‘माफियासेना’मध्ये जर हिंमत असेल तर माझ्या घरी, माझ्या बिल्डिंगच्या खाली येऊन दाखवा. आम्हाला गुंडगिरी करायची नाही. माझ्या घरी आले, घराखाली आले तर आम्ही स्वागत करू, चहापाणी देऊ. पण परत विचारू की दारूचा धंदा कसा काय सुरू झाला? प्रश्न तर हाच विचारणार संजय राऊत किती कोविड सेंटर लंपास केले? प्रश्न उद्धव ठाकरेंनाही विचारणार. २० हजार रूग्ण आढळले तर लॉकडाउन हे कशासाठी किशोरी पेडणेकर म्हणत होत्या? कारण, महापौरांनी ही घोषणा केली त्याच्या तिसऱ्याच दिवशी कोविड काँट्रॅक्ट शिवसेनेच्या नेत्याला मिळालं. त्या कोविड सेंटरमध्ये आजपर्यंत एकही रूग्ण भरती झालेला नाही, मात्र कोट्यावधी रुपयांचं पेमेंट झालं. म्हणूनच उद्धव ठाकरे, संजय राऊत, महापौर हे कोविडचा धंदा करत आहेत.” असं किरीट सोमय्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दापोली रिसॉर्ट प्रकरण : अनिल परब हे लवकरच ऑर्थर रोड तुरुंगात अनिल देशमुखांचे सख्खे शेजारी – किरीट सोमय्या

पत्रकारपरिषदेत बोलताना किरीट सोमय्या यांनी सांगितलं की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दोन राजकीय हात आहेत. उजवा आणि डावा, संजय राऊत आणि अनिल परब. अनिल परबचे धंदे आपण पाहिले. मला संजय राऊत यांना विनंती करायची आहे, की माझे आणि अमित शाह यांचे मुलं ढोकळा विकत असतील किंवा फुटाणे विकत असतील. परंतु आपले मित्र परिवार काय काय धंदे करतात? फक्त दारूच विकतात, की आणखी काय काय उद्योग-धंदे करतात? त्याची माहिती आपण देशाला देणार की किरीट सोमय्या यांनी पुढील आठवड्यात द्यावी. आपला मित्र परिवार हे दारूचे धंदे तर करायला लागले आहेत. ज्याचा तुमचा, तुमच्या परिवाचा कधीही कुठल्या धंद्याशी दमडीचा संबंध नाही, अनुभव नाही, त्या धंद्याचं शिक्षण नाही आणि त्यात ज्याचा १०० कोटींची उलाढाल आहे, आता नवीन निर्णयामुळे ५०० कोटींची उलाढाल होणार तो तुम्हाला पार्टनर बनवतो?, अशा आणखी कुठल्या धंद्यात आपण पार्टनर आहात? संजय राऊत करोना काळात किती कोटी रुपयांचा व्यवहार केला?”

तसेच, “उद्धव ठाकरे यांचे उद्योगधंदे बघा, या माफिया सरकारचे. कोविडमध्ये महापौरांच्या कंपनीला कोविड सेंटर्सचे काँट्रक्ट? कोट्यावधी रुपयांचा धंदा. संजय राऊत आपल्या मित्र परिवाराला किती काँट्रॅक्ट मिळाले? कशा पद्धतीने मिळाले? याची माहिती आपण देणार का? ” असा सवाल देखील त्यांनी केला.

याचबरोबर, “माझी विनंती संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. कोविड सेंटर्स चालवण्याचे ज्यांना काँट्रॅक्ट देण्यात आले, हे कोण आहेत? त्यांची लायकी म्हणजे त्यांची पात्रता काय? याची माहिती जनतेला द्या. मी तर देणारच आहे, पण उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत नाही. लुटमार केली, माफियागिरी केली आता बघा कसे एक-एक उद्धव ठाकरे यांच्या माफिया सरदारांना आम्ही पाठवतोय. अनिल परब झाले, मुंबईचे महापौर झाले आता संजय राऊतांची वेळ आहे. किती कोटींचा कोविडचा धंदा केला? काय पात्रता होती तुमच्या मित्र परिवाराच्या कंपनीची? तुमच्यामुळे किती रुग्णांचा मृत्यू झाला? मी जबाबदारीने सांगतोय, संजय राऊत यांनी उत्तर द्यावं. तुमच्या या व्यवसायात तुमच्या मित्र परिवाराचा, या कोविड व्यवसायामुळे किती निर्दोष नागरिकांचे मृत्यू झाले? याची माहिती उद्धव ठाकरे यांनी द्यावी, संजय राऊत यांनी द्यावी. अन्यथा पुढील आठवड्यात किरीट सोमय्या देणार.” असंही सोमय्या यांनी बोलून दाखवलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kirit somaiya criticizes sanjay raut and chief minister uddhav thackeray msr