मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:च्या पदाचा गैरवापरकरून कुटुंबीयांचा व आपल्या कंपनीचा फायदा करून घेतल्याचा आरोप करणारी जनहित याचिका भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. गरीब झोपडपट्टीवासियांसाठी बांधण्यात आलेले अर्धा डझनहून अधिक गाळे पेडणेकर यांनी बेकायदेशीररित्या अपारदर्शक पद्धतीने स्वत:च्या परिवाराच्या, कंपनीच्या ताब्यात ठेवल्यासंबंधीचे पुरावे डॉ. किरीट सोमय्या यांनी याचिकेत दिले आहेत.

खोट्या कागदपत्रांद्वारे बनावट पद्धतीने या गाळ्यांचा वापर करणे, आर्थिक उत्पन्नाचे साधन बनवणे, झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याचा भंग करून स्वत:चा फायदा करून घेण्याचे काम महापौर  किशोरी पेडणेकर यांनी वरळी गोमाता जनता सहकारी सोसायटीद्वारा केले असा आरोप सोमय्या  यांनी केला आहे. या जनहित याचिकेत किरीट सोमय्या यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई महापालिका, राज्य सरकार व अन्य १९ लोकांना प्रतिवादी केले आहे. दिव्या शाह असोसिएट्स सॉलिसीट्सच्या तर्फे ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

आजच महापौर किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांना शिखंडी असं संबोधलं होतं. तसंच त्यांनी आता फक्त साडी नेसायची बाकी आहे ती नेसवण्याचं कामही आम्ही करुन देऊ अशीही टीका केली होती. आता किरीट सोमय्यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचं या याचिकेत त्यांनी म्हटलं आहे.