अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून सरकारी फाईल तपासल्याने वाद, किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी नगरविकास मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून सरकारी फाईल तपासण्याच्या वादावर प्रतिक्रिया दिलीय.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी नगरविकास मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून सरकारी फाईल तपासल्यावरून मोठा वाद निर्माण झालाय. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यावर आक्षेप घेत सोमय्यांवर कारवाईची मागणी केली. यानंतर आता स्वतः किरीट सोमय्या यांनी या वादावर पहिली प्रतिक्रिया दिलीय. मी माहितीसाठी कठेही जाते आणि यापुढेही जाणार आहे, असं मत सोमय्यांनी व्यक्त केलं. तसेच माझी आणखी एक चौकशी होऊ जाऊ दे, असं आव्हान ठाकरे सरकारला दिलंय. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

किरीट सोमय्या म्हणाले, “त्यांना नेमकी भीती कसली आहे, कोणत्या कोणत्या फाईल तपासल्या त्याची की वायकरची फाईल होती, की सरनाईकची फाईल होती की अशोक चव्हाण यांची फाईल होती याची भीती आहे? मला वाटतं भीती ती आहे. आम्हाला जगभरातून माहिती मिळते. वेगवेगळ्या स्तरावरून लोक माहिती देतात. घोटाळेबाजांची माहिती दिली जाते. यात उद्धव ठाकरेंपासून अशोक चव्हाण यांच्यापर्यंत समावेश असतो.”

“मी माहितीसाठी कुठेही जातो आणि यापुढेही जाणार आहे. मी माहिती गोळा करतो आणि घोटाळेबाजांना पाठवतो,” असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं.

“ठाकरे सरकारकडून माझ्यावर अब्रनुकसानीच्या १३ खटले दाखल”

सचिन सावंत यांनी शासकीय कार्यालयात बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याचा आरोप केलाय. यावर किरीट सोमय्या म्हणाले, “आतापर्यंत ठाकरे सरकारने माझ्यावर अब्रनुकसानीच्या १३ खटले दाखल केलेत. माझ्यासह माझ्या कुटुंबाच्या चौकश्या लावल्या आहेत. आणखी एक चौकशी, होऊन जाऊ दे.”

सचिन सावंत काय म्हणाले होते?

हेही वाचा : सोमय्यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासल्याने वाद; काँग्रेस, राष्ट्रवादीचा संताप, म्हणाले “मानसिक स्थिती…”

काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले होते, “सदर मंत्रीमंडळातील टिप्पणी ही पुढील बैठकीत इतिवृत्तांत जोपर्यंत मंजूर केली जात नाही, तोपर्यंत माहिती अधिकारात उपलब्ध केली जाऊ शकत नाही आणि गोपनीय स्वरुपात मोडते. त्यामुळे या टिप्पणीला इतिवृतांतात मंजुरी मिळाली का? नसेल तर किरीट सोमय्या यांना कशी मिळाली याची चौकशी झाली पाहिजे.”

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“नगरविकास खात्याने हे तपासून पहावं. फाईल त्या विभागाच्या ताब्यात असतात. जो या सरकारचा घटक किंवा संविधानिक पद नाही अशी कोणी व्यक्ती फाईल उघडून पाहू शकतं असं मला वाटत नाही,” असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. दरम्यान अधिकारी उभे होते यासंबंधी विचारण्यात आलं असता, एखादा माजी खासदार आलाच तर मराठी माणूस मोठ्या माणसासाठी खुर्ची रिकामी करतो, त्यात त्यांचा दोष नाही म्हणाले. दरम्यान किरीट सोमय्या यांनी आरटीआयअंतर्गत आपण माहिती मागितली होती असा दावा केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kirit somaiya first reaction of dispute over checking government files in ministry pbs

Next Story
हिंदुत्वावरुन संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले “बाळासाहेबांचं मन मोठं असल्याने…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी