पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशीरा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाल्याचं चित्र दिसत आहे. सपना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी वाकोला पोलीस स्थानकामध्ये संजय राऊतांविोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता तिसऱ्या एका प्रकरणात शिवसेनेच्या प्रवक्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीय. विशेष म्हणजे राऊत यांच्याविरोधातील आणखीन एका प्रकरणाकडे सोमय्या यांनी लक्ष वेधताना त्यांच्या दुबईवारीचाही उल्लेख केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी ‘ईडी’ने छापे घालून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. त्यानंतर राऊत यांना ‘ईडी’च्या कार्यालयात नेण्यात आले. तिथे रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर रात्री उशीरा राऊत यांना ईडीने अटक केल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. या अटकेमुळे सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष हा संघर्ष पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. असं असतानाच दुसरीकडे वाकोला पोलीस स्थानकामध्ये संजय राऊतांविरोधात कलम ५०४, ५०६ आणि ५०९ अंतर्गत सपना पाटक यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपना पाटकर या पत्रा चाळ प्रकरणातील साक्षीदार आहेत.

पत्राचाळ प्रकरणावरुन धमकावल्याच्या संदर्भातून राऊतांविरोधात सपना यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी राऊतांविरोधात प्राध्यापक मेहता किरीट सोमय्यांच्या मानहानी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिलीय. प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये सोमय्या यांनी, संजय राऊतांविरोधात तीन खटले आतापर्यंत दाखल करण्यात आलेत. १२०० कोटीचा घोटाळा आणि सपना पाटकर या महिलेशी दुर्व्यवहार आणि धमक्या दिल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झालाय तर तिसरं प्रकरण म्हणजे प्रोफेसर डॉ. मेहता किरीट सोमय्याच्या मानहानी च्या घटल्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, अशी माहिती दिली.

या मानहानी प्रकरणामध्ये शनिवारपासून सुनावणी आहे, असंही सोमय्या यांनी सांगितलं. तसेच सोमय्या यांनी युनीटेक घोटाळ्यामध्येही राऊत यांचा संबंध असल्याचं सूचक विधान केलं आहे. “पुढे किती गुन्हे दाखल होणार हे तर तपास यंत्रणाच सांगू शकतील मात्र मला अजून एक माहिती आहे ती वसई विरारच्या युनीटेक बिल्डर घेटाळ्यासंदर्भात. हा जो घोटाळा झालाय तो आणि विदेशातल्या संजय राऊत यांच्या वाऱ्या, दुबईतल्या हॉटेलमधली ती मिटींग… आगे आगे देखो होता हैं क्या,” असं म्हणत सोमय्या यांनी सूचक विधान केलं आहे. त्यामुळे आता या युनीटेक घोटाळा प्रकरणामध्येही राऊत यांच्या अडचणी वाढणार का अशा प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya on sanjay raut indicates shivsena mp involve in one more case from vasai virar scam scsg
First published on: 01-08-2022 at 12:20 IST