लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि बडनेराचे आमदार रवि राणा यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सिटी बॅंक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. आमदार रवि राणा यांच्या तक्रारीनंतर ईडीने अडसुळ यांना समन्स पाठवले आहे. त्यानंतर ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहचले होते. दरम्यान प्रकृती खालावल्याने आनंदराव अडसूळ यांना स्ट्रेचवरुन बाहेर आणण्यात आलं आणि नंतर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं आहे. त्यानंतर आता माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी सिटी कोऑपरेटिव बॅंक बुडवली. ९४ कोटी छोट्या गुंतवणूकदारांचे रुपये गेले. कोट्यावधी रुपये अडसूळ यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी गुंतवणूकदारांसाठी काही कारवाई केली नाही. ईडीने अनेक समन्स पाठवल्यानंतरही अडसूळ जात नव्हते. त्यामुळे आज अडसूळ यांना अटक करण्यात आली आहे. छोट्या गुंतवणूकदारासांठी झालेल्या या कारवाईचे मी स्वागत करतो. मंत्री नेत्यांनी जनतेला लुटायचं आणि मग कारवाई झाली तर ती सुडापोटी झाल्याचे म्हणायचे. घोटाळेबाजांविरुद्ध कारवाई होणारचं,” असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

“आनंदराव अडसूळ आणि त्यांच्या जावयाने सिटी कोऑपरेटिव बॅंकेला स्वतःच्या मालमत्ता भाड्याने दिल्या. त्या बॅंकेचे चेअरमन हे आनंदराव अडसूळ आहेत. बॅंकेतील खातेदारांचे पैसे अवैध पद्धतीने बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आले. त्यामुळे ही बॅंक बुडाली. यामध्ये ९८० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल होऊन दोन वर्ष झाली मात्र मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे असल्यामुळे यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर मला आज माहिती मिळाली आहे की आनंदारव अडसूळ यांना अटक झाली आहे. हळूहळू तुमच्यावरही ही वेळ येणार आहे,” असे आमदार रवि राणा यांनी म्हटले आहे.

“आनंदराव अडसूळ यांच्या घरी इडीचे अधिकारी आले असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरु असेल. ईडीचे अधिकारी इतक्या सकाळी आल्यानंतर मला वाटले की त्यांना अटक झाली असेल. कारण गंभीर गुन्हा त्यांनी केला आहे. ईडीने कारवाई केली असेल तर खातेदारांना नक्की न्याय मिळेल,” अशी प्रतिक्रिया रवि राणा यांनी दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya reaction after ed action against anandrao adsul abn
First published on: 27-09-2021 at 12:08 IST