scorecardresearch

“आदित्य ठाकरे यांची ७ कोटी रुपयांची चोरी पकडली, काय कारवाई झाली?”, किरीट सोमय्यांचा सवाल

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केले आहेत.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केले आहेत. “आदित्य ठाकरे यांची ७ कोटी रुपयांची चोरी पकडली गेली. यावर उद्धव ठाकरे यांनी काय कारवाई केली?” असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी विचारला. तसेच हे वसुली सरकार असल्याचा आरोप केला. सोमय्या शुक्रवारी (१३ मे) उल्हासनगरमध्ये भाजपा आमदार कुमार आयलानी यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.

किरीट सोमय्या यांनी यावेळी ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “आदित्य ठाकरे यांची ७ कोटी रुपयांची चोरी पकडली गेली आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी काय केलं? रश्मी उद्धव ठाकरे यांचा १९ बंगल्यांचा घोटाळा बाहेर आला, त्यावर काय केलं? उद्धव ठाकरे यांच्या मेव्हुण्याची साडेसहा कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली, काय केलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरे यांनी द्यावीत.”

“हजारो लोकांच्या जीवाशी खेळण्याचा खेळ थांबावा”

किरीट सोमय्या उल्हासनगरमधील घरांच्या पुनर्विकासावरही बोलले. “उल्हासनगरमध्ये अडीच लाख लोकांचा घराचा प्रश्न आहे. त्यांच्या घरांचा पुनर्विकास करण्याचा तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. त्याबाबत कमिट्यांचा अहवाल देखील आला आहे. भाजपाचे उल्हानगर आमदार कुमार आयलानी या प्रश्नावर येथे आंदोलन करत आहेत. मी या माफिया सरकारला इशारा देतो की तुमच्या वसुलीसाठी हा पनुर्विकास तुम्ही थांबवून ठेवलं आहे. ते बंद करा. या हजारो लोकांच्या जीवाशी खेळण्याचा खेळ थांबावा,” असं मत सोमय्या यांनी व्यक्त केलं.

“उद्धव ठाकरे हनुमान चालिसा म्हणणाऱ्याला राजद्रोह म्हणतात”

किरीट सोमय्या म्हणाले, “राम हा हिंदुस्थानातील असा देव आहे की प्रत्येकजण रामराज्य आणायचा प्रयत्न करतो. मात्र, उद्धव ठाकरे रामभक्त हनुमान यांचा हनुमान चालिसा म्हणणाऱ्याला राजद्रोह म्हणतात. तसेच राजद्रोहासाठी तुरुंगात टाकतात. आमचं स्पष्ट मत आहे की अयोध्येला रामाचं दर्शन करण्यासाठी ज्यांना जायचं असेल त्यांना दर्शन करायला मिळालं पाहिजे.”

हेही वाचा : उत्तर प्रदेशात भाजपाकडून राज ठाकरे यांना विरोध का? किरीट सोमय्या म्हणाले…

“सर्वांना रामाचं दर्शन घेण्याचा अधिकार आहे”

“राम मंदिर अयोध्येचं असो की उल्हासनगरचं सर्वांना रामाचं दर्शन घेण्याचा अधिकार आहे. रामाच्या शरणात जो जातो ते मंजूर आहे, मात्र उद्धव ठाकरेंनी एक नेता अयोध्येला जात असताना लगेच आपल्या मुलाला अयोध्येला पाठवून दिलं. त्याचवेळी त्याच रामाचा भक्त हनुमानाचा चालिसा म्हणणाऱ्याला राजद्रोह म्हणून जेलमध्ये टाकतात,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kirit somaiya serious allegations on aaditya thackeray about corruption pbs

ताज्या बातम्या