राज्य सरकारावर विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर टीका करण्याची एकही संधी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया सोडत नाहीयेत. गेले काही दिवस राज्यात विविध ठिकाणी जाऊन भेटी देत, व्हिडिओ बनवत तर कधी पत्रकार परिषदा घेत राज्य सरकार मधील विविध मंत्री आणि नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप सोमैया करत आले आहेत. विशेषतः ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स अशा खात्यांनी केलेल्या कारवाईंमुळे, छापेमारीमुळे सोमैया यांच्या आरोपांना अधिक धार आलेली बघायला मिळत आहे. 

दसरा सणाचे निमित्त साधत सोमैया यांनी राज्य सरकारवर टीकेची संधी सोडलेली नाही. सोमैया यांनी त्यांच्या मुलुंड इथल्या निवासस्थानाबाहेर राक्षसाचा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याला ‘वसुली सरकार घोटाळे’ असं नाव दिलं आहे. राज्य सरकारवर आरोप केलेल्या घोटाळ्यांची नावे या पुतळ्यावर सोमैया लिहिली आहेत. या पुतळ्याचे दहन करत राज्य सरकारचा निषेध सोमैया करणार आहेत.