मुंबई : वायव्य मुंबई मतदारसंघातील मतदान यंत्राच्या मतमोजणीत अमोल कीर्तिकर एका मतांने पुढे होते. २५व्या फेरीनंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये रवींद्र वायकर यांना ४९ मते मिळाली. त्यामुळे वायकर ४८ मतांनी विजय झाले. ७ वाजून ५३ मिनिटांनी निकाल घोषित केल्यानंतर ८ वाजून ६ मिनिटांनी कीर्तीकर यांनी फेरआढाव्याचा अर्ज केला, असा खुलासा निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी रविवारी केला. मतमोजणीत कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचेही त्या म्हणाल्या.

वायव्य मुंबई मतदारसंघात मतमोजणीतील कथित घोळाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली असून शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. मतमोजणी प्रक्रियेनुसार झाली आहे. पोस्टल मतपत्रिकांमध्ये १११ पत्रिका बाद ठरल्या. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे पोस्टल मतपत्रिकेमुळे निकाल बदलला, हा प्रचार खोटा आहे, असे सूर्यवंशी यांचे म्हणणे आहे. दिनेश गुरव हा आपला कर्मचारी आहे. त्याच्याकडील भ्रमणध्वनी वायकरांचे कार्यकर्ते मंगेश पंडीलकर यांच्याकडे कसा गेला, याचा तपास पोलीस करत असल्याचे त्यांनी सांगितले. मतमोजणी केंद्रात भ्रमणध्वनी नेण्यास परवानगी नसल्याचे सांगतानाच गुरवला निलंबित करण्यात आले आहे. मात्र मतमोजणी आणि भ्रमणध्वनीचा वापर याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, असा दावा त्यांनी केला. मतमोजणी केंद्रात अनेक प्रतिनिधींच्या हाती भ्रमणध्वनी होते. त्या सर्वांना नियमाप्रमाणे दंड करा, अशी मागणी विजयी उमेदवार वायकर यांनी केली. वायव्य मुंबई मतदारसंघातील मतमोजणीबाबत सारेच संशयास्पद असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>>राज्य शासनाकडून भूखंड अदानी समुहाला नव्हे तर धारावी पुनर्विकास कंपनीला!

ईव्हीएमभ्रमणध्वनीचा संबंध नाही’

मतदान यंत्राला भ्रमणध्वनी जोडणे शक्य नाही. मतदान यंत्र (ईव्हीएम) ही स्वतंत्र प्रणाली आहे. मतदान यंत्रातील मतांची मोजणी करण्यासाठी (अनलॉक) ओटीपी (वन टाईम पासवर्ड) लागत नसतो. ईव्हीएम आणि भ्रमणध्वनीचा काही संबंध येत नाही, असे वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. मतमोजणीला उमेदवारांचे प्रतिनिधी हजर असतात. त्यांच्यासमोर मतमोजणी पार पडल्याचे त्या म्हणाल्या.

नऊ मतदारसंघात तुम्ही विजयी झाला आहात आणि गडबड फक्त इथेच झाली का? पोलीस याप्रकरणी सर्व वस्तुस्थिती पुढे आणतील. – एकनाथ शिंदे</strong>मुख्यमंत्री

जो खासदार बेकायदा पद्धतीने निवडून आला आहे, त्याला आता खासदारकीची शपथ देणार का? ही लोकशाहीची सरळ सरळ थट्टा आहे. – आदित्य ठाकरे</strong>शिवसेना नेते