मुंबई : नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचा दिलासा देण्याच्या किसान सभेच्या मागणीवर कर्जमाफीसाठीच्या उपसमितीत चर्चा करू. त्या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू. नियमित कर्जदारांना दिलासा देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्याची माहिती किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.
आझाद मैदानावर मंगळवारी किसान सभेच्या वतीने नियमित कर्जदारांना दोन लाखांपर्यंत प्रोत्साहन निधी द्यावा. देवस्थान, गायरान जमीन, घराच्या तळ जमिनी शेतकरी, श्रमिकांच्या नावे कराव्यात. पीकविमा योजनेचे निकष पूर्ववत करून योजना शेतकरी हिताची करावी. अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी. पेसा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणे त्वरित बंद करावे आदी मागण्यांसाठी शेतकरी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात राज्यभरातील २१ पेक्षा जास्त जिल्ह्यांतून शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, आमदार विनोद निकोले, उमेश देशमुख आदी उपस्थितीत होते.
किसान सभेच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात कृषिमंत्री भरणे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली. नियमित कर्जदारांना दोन लाखांपर्यतचा दिलासा देण्याच्या मागणीवर कर्जमाफीसाठीच्या उपसमितीत चर्च केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. पीकविमा योजनेच्या निकषांबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले आहे.
देवस्थान जमिनी, गायरान जमीन, घराच्या तळ जमिनी शेतकरी, श्रमिकांच्या नावे करण्याबाबत. पेसा कर्मचाऱ्यांबाबत महसूल मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. संभाव्य देवस्थान जमीन कायद्याचा मसुदा तयार करताना किसान सभेच्या मागण्यांचा विचार केला जाईल, अशी ग्वाही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली आहे. आमच्या मागण्यांवर सरकारकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. अन्यथा लढ्याचा मार्ग खुला आहे, असा इशाराही नवले यांनी दिला आहे.
