मुंबई : मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नगरसेवक आणि आमदार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची लेखी तक्रारच केली.

मुंबईकरांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत केलेल्या पत्रव्यवहारावर महापौरांकडून कोणतेही उत्तर मिळत नाही व अपेक्षित प्रतिसादही मिळत नाही अशी तक्रार एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्या आणि महापौर यांच्यातील वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत.

मुंबईतील विविध प्रश्नांबाबत महापौरांना पाठवलेल्या पत्रांवर उत्तर न मिळाल्याने विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी गेल्या आठवड्यात महापौरांच्या दालनात घुसून कर्मचाऱ्यांना जाब विचारला. याबाबतची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी संताप व्यक्त केला होता. रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर यांच्यात नेहमीच समाज माध्यमांवरून वाद होत असतात. मात्र यावेळी या वादाला गंभीर वळण आले आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अति मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. विशेषत: झाडे पडणे, इमारत कोसळणे, वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणे, रस्त्यावर पाणी साचणे यामुळे नागरिकांच्या सुरक्षितता तसेच विविध नागरी सुविधा यावर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून त्याच दरम्यान शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते. शिवसेना शिष्टमंडळात पेडणेकर यांच्याबरोबर आमदार सुनील प्रभू, आमदार अनिल परब, आमदार सुनील शिंदे, आमदार अजय चौधरी, आमदार महेश सावंत आदींचा समावेश होता.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे अत्यावश्यक आहे. मुंबईकरांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत करणे गरजेचे आहे. मुंबईच्या विद्यमान महापौरांकडे याविषयी वेळोवेळी पत्रव्यवहार करून विविध प्रश्न मांडले आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप कोणतेही लेखी उत्तर प्राप्त झालेले नाही. तसेच महापौर कार्यालयाकडे विचारणा केल्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. मुंबईकरांच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने उपायोजना करण्याबाबत महापौरांना निर्देश द्यावेत. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करावी आणि आवश्यक निर्णय घेण्यासाठी सकारात्मक पुढाकार घ्यावा, अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी निवेदनात केली आहे.