मुंबई : मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामाची विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी पाहणी केली. गाळ काढण्याच्या कामाला आधीच उशीर झाला असून हा कालावधी कसा भरून काढणार, असा सवाल या पाहणीनंतर पेडणेकर यांनी केला आणि सत्ताधारी महायुतीवर टीका केली. तसेच महापौर रितू तावडे यांचा कार्यकाळ फक्त स्पष्टीकरण देण्यातच जाणार का, अशीही खोचक टीका पेडणेकर यांनी यावेळी केली.
मिठी नदीतून गाळ काढण्याचे काम यंदा खूपच रखडले आहे. मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी गेल्यावर्षी नेमलेल्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर काही कंत्राटदार तुरुंगात गेले, त्यांची चौकशी सुरू झाल्यामुळे मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम कंत्राटदारांनी अर्धवट अवस्थेत सोडले होते.
त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने २८ फेब्रुवारी रोजी मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी निविदा काढली होती. मात्र मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी कोणीही कंत्राटदार पुढे येत नव्हते. निविदेला दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर कंत्राटदार मिळाले असून मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात झाली. या कामांची विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी सकाळी पाहणी केली. यावेळी पालिकेचे अधिकारी त्यांच्यासोबत होते.
पाहणीनंतर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, आम्ही सत्तेत होतो तेव्हा मिठी नदीतील गाळ काढण्याची कामे लवकर सुरू होत होती. यंत्रसामग्री आणण्याचे कामही वेळेत केले जात होते. यंदा तब्बल १२ ते १५ दिवस उशीरा काम सुरू झाले. हा कालावधी कसा भरून काढणार, गाळ काढण्याचे काम कसे करणार, असा सवाल पेडणेकर यांनी केला.
आदित्य ठाकरे पालकमंत्री असताना मार्चमध्ये पाहणी व्हायची. आता काम किती उशिरा सुरू झाले आहे. काढलेला गाळ सुकायाला ४८ तासांंपेक्षा जास्त काळ लागतो. आता अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. तशी परिस्थिती आल्यास गाळ पुन्हा नदीत वाहून जाण्याची शक्यता आहे. गाळ काढण्याची कामे नीट झाली नाहीत तर आमचे लक्ष असेलच आणि मुंबईकरही पाहत आहेत, असाही इशारा पेडणेकर यांनी दिला.
कंत्राटदारांना गुडघ्यावर आणले, पण कसे ?
मिठी नदीसाठी कंत्राटदार मिळत नव्हते, तेव्हा कंत्राटदारांना गुडघ्यावर आणले असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो आहे. मात्र कंत्राटदारांना आणले ते अटी शिथील करून आणले हे सगळ्यांना माहीत आहे, अशीही टीका पेडणेकर यांनी केली.
महापौरांवर टीका
यावेळी किशोरी पेडणेकर यांनी महापौर रितू तावडे यांच्यावरही टीका केली. कोणी काय बोलले की स्पष्टीकरण द्यायला महापौर येतात. महापौरांचा कार्यकाळ यातच जाणार का, असा सवालही पेडणेकर यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून रितू तावडे यांच्यावर विविध विषयांवरून टीका होत असून त्यावर महापौरांना प्रसारमाध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण द्यावे लागते आहे. या पार्श्वभूमीवर पेडणेकर यांनी ही टीका केली.
