मुंबई : किशोरी पेडणेकर आणि ममता बॅनर्जी या दोघीही बहिण बहिणी आहेत, दोघींनाही खुर्चीचा मोह सुटत नाही अशा शब्दात महापौर रितू तावडे यांनी टीका केली आहे. मुंबई महापालिका सभागृहात किशोरी पेडणेकर यांनी महापौरांच्या खुर्चीत बसण्याचा प्रयत्न सोमवारी केला होता. त्यावरून महापौरांनी पेडणेकर यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई महापालिकेच्या सभागृहात महापौरांच्या खुर्चीवरून सोमवारी नाट्य रंगले. पालिका सभागृहाची दुपारी दोन वाजताची वेळ होती. सभागृहात भाजपचे नगरसेवक वगळता बाकी सर्व पक्षांचे नगरसेवक हजर होते. बराचवेळ झाला तरी सभागृहाचे कामकाज सुरू झाले नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सभागृहाची गणसंख्या (कोरम) पूर्ण झाल्यामुळे सभागृह सुरू करण्याची मागणी केली.
पिठासीन अधिकारी म्हणून माजी महापौरांना खुर्चीत बसवण्याची मागणी पेडणेकर यांनी केली. त्याला ज्येष्ठ नगरसेवक यशोधर फणसे यांनी अनुमोदन दिले. त्याबरोबर पेडणेकर या व्यासपीठावर चढल्या आणि महापौरांच्या खुर्चीच्या दिशेने गेल्या. महापौरांच्या आसनावर त्या बसणार इतक्यात भाजपचे नगरसेवक सभागृहात दाखल झाले आणि भाजपची लाज जाता जाता वाचली. किशोरी पेडणेकर यांच्या वर्तनावर महापौर रितू तावडे यांनी टिका केली आहे.
पालिका मुख्यालयात मंगळवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, आपण आता महापौर नाही, विरोधी पक्ष नेत्या आहोत हे किशोरी पेडणेकर वारंवार विसरतात. तीन राज्यात भाजपला जे यश मिळाले त्याचा विजय आम्ही साजरा करत होतो म्हणून सभागृहात उशीरा आलो. त्याचवेळी पेडणेकर यांनी खुर्चीत बसण्याचा प्रयत्न केला. महापौर पदाचीच त्यांना इर्षा आहे त्यातूनच त्यांनी हे कृत्य केल्याचा टोलाही रितू तावडे यांनी लगावला.
एका दगडात दोन पक्षी …
तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूकींच्यी विजयाचा जल्लोष करण्यासाठी भाजपचे सर्व नगरसेवक पक्ष कार्यालयात जमले होते. तेथून सगळेजण एकत्र सभागृहात येणार होते असे ठरले होते. मात्र सभागृहात इतर सर्व पक्षांचे नगरसेवक हजर होते. त्याचवेळी शिवसेना (ठाकरे) पक्षाने संधी साधली. या निवडणूकीतील निकालाचाच धागा पकडत महापौरांनी किशोरी पेडणेकर यांची तुलना ममता बॅनर्जी यांच्याशी करत एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला.
भाजपवर ठाकरेंच्या शिवसेनेची कुरघोडी …
मुंबई महापालिकेच्या सभागृहात भाजपच्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे गेल्या आठवड्यात भाजपला नामुष्की पत्करावी लागली होती. संख्याबळाअभावी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले होते. हे प्रकरण अजून ताजे असतानाच सोमवारी शिवसेना (ठाकरे) पक्षाने भाजपवर आणखी एक कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. गेली पंचवीस वर्षे सत्तेचा अनुभव असलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्ष सभाशास्त्राद्वारे भाजपवर कुरघोडी करण्याची संधी साधत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.
