मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा तरुणाईचा विजय असून सत्ताधाऱ्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला अशा शब्दात मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी समाजमाध्यमांवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नीट आणि अन्य परिक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांवरून दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) माध्यमांतून आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांनी व तरुणांनी पाठिंबा दिला होता. अनेक दिवस चाललेल्या या आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षही रस्त्यावर उतरले होते. वाढत्या जनरेट्यामुळे अखेर केंद्री शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा हा तरुणाईचा विजय असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच या विजयासाठी सीजेपीचे तरुण नेते अभिजीत दिपके यांचेही अभिनंदन केले आहे.

या निमित्ताने सत्ताधाऱ्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला असल्याचेही पेडणेकर यांनी म्हटले आहे. देशातील तरुणाईने आपण भारतीय आहोत आणि या देशात जात पात व धर्माचे राजकारण चालणार नाही हे दाखवून दिले आहे. तुम्ही सत्ताधारी म्हणून हुकूमशाही किंवा हिटलर पद्धतीने देशातील तरुणांचे भविष्य आणि आवाज दाबून टाकू शकत नाही असेही पेडणेकर यांनी म्हटले आहे.

अभिजीत दिपके यांनी तरुणांना साद घातली त्याला संपूर्ण देशातील तरुणांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. देशातल्या तरुणाईचा हा मोठा विजय आहे. मस्तावलेल्या शिक्षणमंत्र्यांनी स्वत:हून राजीनामा दिला नाही तर देशातील तरुणांच्या ताकदीमुळे त्यांना तो द्यावा लगाला असेही पेडणेकर यांनी म्हटले आहे.

नीट पेपरफुटी आणि शैक्षणिक घोटाळ्यांच्या विरोधात अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थ्यांनी दिल्लीत आंदोलन छेडले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी ठेवली होती. या मागणीवर कोणतीही तडजोड होणार नाही अशी भूमिका घेत राजीनामा दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन हटणार नाही असाही इशारा देण्यात आला होता. तसेच यावर निर्णय घेण्यासाठी २४ तासांची म्हणजेच रविवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती.

या आंदोलनामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. त्यामुळे अखेर प्रधान यांनी राजीनामा दिला. दरम्यान, पक्षीय झेंडे बाजूला सारून केवळ तिरंग्याला स्थान देत शिवसेनेचे (ठाकरे) नेते आदित्या ठाकरे यांनी दादरच्या शिवाजी पार्क येथे शुक्रवारी तिरंगा आंदोलन केले होते. त्यालाही तरुणांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता.