मुंबई : पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी या तीन राज्यातील विधानसभा निवडणूकीत मिळालेल्या यशाच्या निमित्त भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी सोमवारी मुंबई महापालिका मुख्यालयात जल्लोष केला. मुंबई महापालिका सभागृहात अभिनंदनाचा ठराव मांडून भाजपने विजयाचा आनंद साजरा केला व सभागृहात पेढे वाटले.
तर दुसरीकडे काँग्रेसनेही केरळच्या विजयासाठी सभागृहात पेढे वाटले. या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपला नसरापूरच्या दुर्दैवी घटनेची आठवण करून दिली. तसेच सगळीकडे हिंदुत्व लोणच्यासारखे वापरू नका असा खोचक सल्ला दिली.
आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू या चार राज्यातील तर पुद्दुचेरी या केंद्र शासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्याचे पडसाद सोमवारी पालिका महासभेतही उमटले. तीन राज्यात मिळालेल्या यशाबद्दल भाजपने सभागृहात आनंद साजरा केला. भाजपचे सगळे नगरसेवक भगव्या रंगाचे शेले घालून सभागृहात हजर झाले होते.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच सभागृह नेते गणेश खणकर यांनी भाजपच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तीन राज्यात मिळालेल्या यशाचा आम्हाला अभिमान आहेच पण पश्चिम बंगालच्या निवडणूकीत यश मिळाले, तेथील जनतेने जो कौल दिला त्याचा आम्हाला विशेष अभिमान असल्याचे मत यावेळी खणकर यांनी व्यक्त केले. शामाप्रसाद मुखर्जी यांनी ज्या ठिकाणी बलिदान दिले तिथे विजय मिळवला ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.
खणकर यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा त्यांनी अभिनंदनाच्या ठरावा अनुमोदन करत नाही तर केवळ अभिनंदन करीत असल्याचे स्पष्ट केले. सगळीकडे हिंदूत्व लोणच्यासारखे वापरू नका, असा खोचक सल्ला त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिला. जल्लोष कसला करता इथे महाराष्ट्रात नसरापूर येथे एका बालिकेवर अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. त्याबद्दल तुम्ही एक शब्दही बोलत नाही अशी टीका पेडणेकर यांनी केली. विजयाच्या आनंदात तुम्हाला या घटनेचा विसर पडला, असाही आरोप पेडणेकर यांनी केला.
दरम्यान, नसरापूर दुर्घटनेच्याप्रती आमच्याही संवेदना आहेत, अशी प्रतिक्रिया स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे. या दुर्घटनेतील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे, या प्रकरणात जलदगती न्यायालयाच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण केली जाईल, सरकार पिडित कुटुंबाच्या पाठिशी असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा हा विषय महापालिकेच्या सभागृहात घेऊन विरोधीपक्षनेत्यांना केवळ राजकारण करायचे आहे असाही टोला शिंदे यांनी मारला आहे.
