अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केलीय. २३ एप्रिल रोजी आपण मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचणार असल्याचं राणा दांपत्यानं जाहीर केलं होतं. मात्र, आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणा दांपत्यानं आंदोलन थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

नक्की वाचा >> मातोश्री समोरील राणा दांपत्याच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा आहे का?; चंद्रकांत पाटील स्पष्टचं बोलले, “आमचा पाठिंबा त्या…”

“राज्यात पोलिसांना, सामान्य जनतेला त्रास होऊ नये आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रस्तावित मुंबई दौरा रद्द होऊ नये यासाठी आम्ही आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे”, असं रवी राणा यांनी सांगितलं आहे. मात्र हे आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणा दांपत्यावर निशाणा साधलाय.

“याला त्यांनी आंदोलन म्हटलंय. आम्ही मुळात आंदोलन म्हणतच नाही. आमचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे, बाळासाहेब, मातोश्री, सेना भवन, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल महाराष्ट्र आणि मुंबईतील लोकांना एक आदरभाव आणि श्रद्धाभाव आहे. जर तुम्ही थेट आमच्या मातोश्रीला आव्हान देणार. थेट येऊन वाचूनच दाखवणार असं म्हणत असाल तर तुम्ही आहात कोण?,” असा टोला महापौर पेडणेकर यांनी लगावला. “आम्हाला कळलंय तुमची २०२४ ची तयारी चाललीय. आता पवारांचा पाठिंबा तुम्हाला मिळणार नाहीय. निवडून तर यायचं आहे. नौटंकी करुनच निवडून यायचं आहे. यांच्या सगळ्या नौटंक्या सुरु राहणार,” असंही त्या प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

नक्की वाचा >> हनुमान चालिसा राक्षस चालिसा आहे का? विचारत चंद्रकांत पाटील म्हणाले, “मातोश्री, राणांच्या घराबाहेर जे काही चाललंय त्याचा…”

“ज्यापद्धतीने त्यांनी माघार घेतली. माघार नाही फाटली म्हणून माघारी गेले,” असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातव विघ्न नको म्हणून आम्ही माघार घेत असल्याचं राणा दांपत्याने म्हटलंय असं सांगितल्यानंतर पेडणेकर यांनी, “आता त्यांची काहीही कारणं असती. त्यांना शिवसैनिकांनी खाली उतरुच दिलं नाही. शिवसैनिकाला टेस्टींगची गरज लागत नाही तो ऑलरेडी चार्जेबल असतो. फक्त यामुळे त्यांना २४ तास प्रसिद्धी झोतात राहता आलं. असं केल्याने त्यांना सहज प्रसिद्धी मिळते,” अशा शब्दांमध्ये त्यांनी टीका केली