मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटापेक्षा भाजप परवडली, असे मत दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या एकनिष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले. भाजप किमान लोकांच्या हिताचा निर्णय तरी घेते, पण शिवसेनेचे (शिंदे) लोकप्रतिनिधी मनमानीपणाने काम करीत असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला आहे.
शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर पहिलीच महापालिका निवडणूक पार पडली असून पालिकेत सध्या शिवसेनेचे दोन गट सभागृहात आमनेसामने आहेत. विविध प्रस्तावांच्या निमित्ताने, कामकाजाच्या निमित्ताने या दोन गटात वारंवार हमरीतुमरी होत असते. एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप होत असतात. मात्र पालिका मुख्यालयात स्थापत्य समितीच्या गुरुवारच्या बैठकीत या दोन गटात एका प्रस्तावावरून वाद झाला.
प्रकरण काय…
वरळी येथील मोहन दामोदर पाटील ते नारायण हर्डीकर मार्ग यादरम्यानच्या रस्त्याच्या अरुंदीकरणाचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या स्थापत्य (शहर) समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला होता. सध्या १८.३३ मीटर रुंदीचा असलेला हा रस्ता १३.४० मीटर रुंद करण्याबाबतचा हा प्रस्ताव होता. स्थापत्य समितीमध्ये हा प्रस्ताव चर्चेला आला असताना शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वरळीतील स्थानिक नगरसेविका पद्मजा चेंबूरकर यांनी या प्रस्तावाला आक्षेप घेतला. मात्र अध्यक्ष यामिनी जाधव यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. यामिनी जाधव या शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेविका असून या घटनेनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
ठाकरेंच्या नगरसेवकांचा विरोध डावलून शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेविका, स्थापत्य (शहर) समिती अध्यक्षा यामिनी जाधव यांनी प्रस्ताव मंजूर केला. कामकाजाच्या पटलावर शिवसेना (शिंदे) पक्षाने ठाकरेंच्या शिवसेनेला चितपट केले. मात्र त्यामुळे संतापलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी प्रसारमाध्यमांसमोर आपला राग व्यक्त केला.
किशोरी पेडणेकर यांचे आरोप
विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर तोंडसुख घेतले. शिंदे गट असा उल्लेख करीत त्या म्हणाल्या की, यांच्यापेक्षा भाजप परवडला. ते मुंबईकरांच्या हिताचा काही तरी निर्णय घेतात, शिंदेंचे नगरसेवक क्रूरपणे निर्णय घेतात, ही कार्यपद्धती एकनाथ शिंदे यांना मंजूर आहे का, असा सवाल पेडणेकर यांनी केला. शिंदे गटाला काही तरी दिले पाहिजे म्हणून समित्यांची अध्यक्षपदे दिली आहेत, त्यांची पात्रता नाही, असेही विधान पेडणेकर यांनी केले. ‘हम करे सो कायदा’ अशा पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोपही पेडणेकर यांनी केला. तुम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे, पण विरोधकांचे ऐकायचेच नाही हे बरोबर नाही.
यामिनी जाधव यांनी आरोप फेटाळले…
दरम्यान, यामिनी जाधव यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. आपण सगळ्यांना बोलण्याची संधी दिली होती असे त्यांचे म्हणणे आहे. मी माहिती घेतली असून मला तो प्रस्ताव योग्य वाटला म्हणून मी मंजूर केला, अशी भूमिका यामिनी जाधव यांनी मांडली.
