दादर- माटुंगादरम्यान विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून खोळंबली आहे. रेल्वे परीक्षेतील गोंधळाविरोधात या विद्यार्थ्यांनी रेल रोकोचे अस्त्र उगारले आहे. रेल्वे अप्रेटिंसना थेट रेल्वेत सामावून घेतले जावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. अप्रेंटिस म्हणजे काय, त्यांच्या कामाचे स्वरुप काय असते हे आधी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

पूर्वीपासूनच रेल्वेमध्ये ट्रेड अप्रेटिंसपदाची भरती केली जाते. या युवकांना रेल्वेच्या मॅकेनिकल किंवा इलेक्ट्रिक विभागात तात्पुरती नियुक्ती दिली जाते. सेवा कालावधीत त्यांना प्रशिक्षित केले जाते. यासाठी त्यांना मानधनही दिले जाते. गेल्या अनेकवर्षांपासून रेल्वेत ही पद्धत आहे. पूर्वी अशा अप्रेटिंसना रेल्वेत सामावून घेण्याचे अधिकार सरव्यवस्थापकांना (जीएम) होते. त्यामुळे अनेकांना रेल्वेत काम करण्याची संधी मिळाली. वर्ष २०११ मध्ये न्यायालयाच्या आदेशाने यात बदल करण्यात आला आणि अप्रेटिंसला रेल्वेत नोकरी देण्याचे जीएमचे अधिकार काढून घेण्यात आले.

आंदोलक विद्यार्थ्यांनी हीच पद्धत पुन्हा सुरू करण्याची आग्रही भूमिका मांडली आहे. आम्ही इतकी वर्षे कमी मोबदल्यावर काम केले. त्यामुळे आम्हाला रेल्वेत कायम करावे, जीएम यांना कायम करण्याचे अधिकार द्यावेत या मागणीवर आंदोलक अडून बसले आहेत.

वर्ष २०११ पूर्वी हजारो अप्रेटिंसना रेल्वेत कायम होण्याची संधी मिळाली होती. तत्कालीन रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव आणि ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात बिहार आणि पश्चिम बंगालमधील अनेक अप्रेटिंस रेल्वेत कायम झाल्याचे बोलले जाते. पण २०११ मध्ये रेल्वे मंत्रालयाने जीएमचे अधिकार का काढले, असा सवाल आज आंदोलक विचारत आहेत. सध्या रेल्वेची मोठी भरती निघाली आहे. रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे की, अप्रेटिंसने ही परीक्षा द्यावी. पूर्व परीक्षा द्यावी. पण हा आमच्यावर अन्याय असून इतरांच्या स्पर्धेत आम्हाला ठेवले जाऊ नये, असे आंदोलक म्हणत आहेत.

  • दिग्विजय जिरगे