मुंबई : बारा दिवसांनी साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांवर मुंबई, गोवा महामार्गावर टोलचा भुर्दंड पडण्याची शक्यता आहे. महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. असे असताना रायगड जिल्ह्यातील खारपाडा येथे टोलनाका सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. महामार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वी खारपाडा येथे टोलवसुली नको, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या सुमारे १७ वर्षांपासून रखडले आहे. महामार्गाच्या विविध टप्प्यांवरील कामे अद्याप अपूर्ण आहेत. अनेक ठिकाणी वाहतुकीच्या अडचणी कायम आहेत. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत अपूर्ण रस्त्यासाठी वाहनचालकांकडून टोलवसुली करणे अन्यायकारक ठरेल, अशी भूमिका तटकरे यांनी मांडली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा आणि सुकेळी येथे टोलनाके सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याने कोकणवासीयांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पळस्पे ते इंदापूर या मार्गावर टोलवसुली सुरू झाल्यास गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी १५ ऑगस्टनंतर भरत गोगावले यांच्याकडे आली आहे.
खारपाडा टोलनाक्याबाबत त्यांच्याकडून अद्याप ठोस भूमिका समोर आलेली नाही. त्याचवेळी महिला विकास व माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे टोलवसुलीला विरोध केला आहे. महामार्गाचे काम पूर्ण होण्यास आणखी वेळ लागणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना टोलच्या स्वरूपात अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, अशी मागणी तटकरे यांनी केली.
