मुंबई: बदलत्या हवामानाचा मोठा फटका कोकणातील हापूस व काजू बागायतदारांना बसला आहे. या फळांना नुकसान भरपाई सरकारने द्यावी यासाठी कोकणातील आमदार विधानसभेत एकत्र आलेले दिसले. हापूस आंब्याला किती आणि कशी नुकसान भरपाई द्यायची या संर्दभात एक बैठक अधिवेशन काळात घेतली जाईल, असे आश्वासन फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिले.
कोकणातील हापूस आंबा उत्पादनाला अवकाळी पाऊस, कडाक्याची थंडी यांचा विपरीत परिणाम झाला आहे. ऑक्टोबर नंतर हापूस आंब्याला मोहर येण्यास सुुरुवात होते. हा मोहर कडाक्याच्या थंडीमुळे गळून गेला. यात ९० टक्के हापूस आंबा बागायतदारांचे नुकसान झाले आहे. राज्यात इतर पिकांना नुकसान भरपाई दिली जाते. त्याप्रमाणे कोकणातील हापूस आणि काजू उत्पादकांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भास्कर जाधव, शेखर निकम, यांनी केली.
कोकणातील आबा बागायतदारांना नुकसान भरपाई देण्यास सरकार सकारात्मक आहे, असे गोगावले यांनी सांगितले. यासाठी एक बैठक अधिवेशन काळात गोगावले घेणार असल्याची माहिती निकम यांनी दिली. कोकणात सध्या १५ आमदार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयातील वैभव नाईक, नितेश राणे, निलेश राणे, दीपक केसरकर, रत्नागिरीतील किरण सामंत, भास्कर जाधव, शेखर निकम, योगेश कदम, रायगड मधील भरत गोगावले, महेंद्र दळवी, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, महेंद्र थोरवे, रवी पाटील, आदिती तटकरे हे आमदार हापूस आंब्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी एकत्र येणार आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील आमदारांचा यासाठी जास्त आग्रह आहे.
