मुंबई : किनारपट्टीच्या विकासासाठी जेट्टी उभारणी आणि जेट्टीपर्यंतच्या रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने १७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मुंबईसह कोकणातील १०४ कामांसाठी हा निधी देण्यात आला असून, जेट्टी, पोचरस्ते, संरक्षक भिंती, धूपप्रतिबंधक बंधारे, गाळ काढणे आणि प्रवासी सुविधांची कामे त्यातून केली जाणार आहेत. यातील ७५ कामांसाठी १२६ कोटी, तर बंदरांपर्यंत रस्ते, रेल्वेमार्ग आणि बॅकवॉटर विकासाच्या २९ कामांसाठी ४४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

‘महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डास सहायक अनुदान, तरंगती जेट्टी व तत्सम प्रवासी सुविधा पुरवणे’ या योजनेतील ७५ कामांकरिता ५७७ कोटी ५३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मार्च २०२६ अखेर या कामांसाठी १३३ कोटी ९२ लाख रुपये वितरित झाले असून, २०२६-२७ मध्ये आणखी १२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ही कामे होतील.

मुंबई परिसरातील कुलाबा-गीतानगर येथील संरक्षक भिंत, खार-दांडा, बेलापूर प्रवासी जेट्टी यांसह डोंबिवली, उत्तन आणि ठाणे परिसरातील जेट्टी व पोचरस्त्यांच्या कामांचा यात समावेश आहे. कुलाबा येथील कामे १०० टक्के मार्गी लागली असून, बेलापूरमध्ये अद्याप ४० टक्के कामे प्रलंबित आहेत. पालघरमधील वसई किल्ला, नायगाव, वसई रो-रो जेट्टी, नारंगी, अर्नाळा किल्ला परिसरातील जेट्टी व प्रवासी सुविधांच्या कामांना निधी देण्यात आला आहे. नायगाव बेनकर जेट्टीची उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

रायगडमधील प्रकल्पांना निधी

रायगडमधील जेट्टी आणि त्यांच्याशी संबंधित सुविधांना प्राधान्य दिले गेले आहे. वसोली येथील रो-रो जेट्टी, पोचरस्ता, गाळ काढणे आणि दगडी बंधाऱ्याची दुरुस्ती, तसेच आक्षीसागर येथील जेट्टी, पोचरस्ता, गाळ काढणे आणि अन्य सुविधांसाठी प्रत्येकी १२ कोटी रुपयांची तरतूद आहे. आक्षीसागरमध्ये २० टक्के कामे झाली असून रेवस जेट्टी परिसरातील वाहनतळ आणि स्वच्छतागृहाचे कामही केवळ ३० टक्केच झाले आहे.

बंदरांपर्यंतचे रस्ते

या कामांना पूरक अशा रस्त्यांकरिता परिवहन विभागाने ‘बंदरापर्यंत रस्ते/रेल्वेमार्ग बांधणे आणि पश्चजल (बॅकवॉटर) विकास’ या योजनेतील २९ कामांसाठी ४४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. याकरिताही ५१७ कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद असून त्यापैकी साधारण ११४ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

या योजनेअंतर्गत पालघरमध्ये शंकर मंदिर-दांडा, पांजू, चिंचणी, सतपती, वडराई, खारेकुरण, वडिव, राजोडी, कळंब आणि नारंगी रो-रो जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण होईल. काही कामांची प्रगती ९० ते १०० टक्क्यांवर पोहोचली असली तरी पिंपळनेर येथील खाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम रखडले आहे.

रायगडमधील रेवदंडा रो-रो जेट्टी, अलिबाग, धरमतर, महाड, मुरूड, नागाव आणि करंजा परिसरातील पोचरस्त्यांची कामे, तर रत्नागिरीतील बंदरांतर्गत रस्ते आणि राजीवाडा येथील बंधाऱ्याचे कामही या योजनेत आहे. १४३ कोटी ९७ लाख खर्चून राजीवाडा बंधारा बांधला जाणार आहे. हे काम २५ टक्क्यांवर झाले आहे.