मुंबई : कोकण प्रदेशात मागील काही दिवसांपासून आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने मुंबईसह कोकणातील बहुतांश भागात उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. उत्तर कोकणातही सरासरीहून अधिक कमाल तापमानाची नोंद होत असून या प्रदेशातील अंर्तगत भागात उष्णेतची तीव्रता अधिक आहे.

कोकण प्रदेशातील सर्वाधिक कमाल तापमान मंगळवारी अलिबाग येथे नोंदले गेले. येथे ३७.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली जे सरासरी कमाल तापमानाहून ४.६ अंशांनी अधिक होते. दरम्यान, बुधवारपासून पुढील तीन दिवस कोकण प्रदेशात उष्ण आणि दमट वातावरण राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

एप्रिल महिन्यात पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे कोकण पट्ट्यातील कमाल तापमानात चढ उतार पाहायला मिळाले होते. या दरम्यान काही भागात पाऊस आणि गारपिटीचीही नोंद झाली होती. सध्या उष्ण आणि दमट वातावरणामुळे या प्रदेशातील नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, हवामान विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मे महिन्यासाठीच्या हवामान अंदाजानुसार, या महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून विदर्भासह कोकण प्रदेशातील काही भागातील कमाल तापमानात वाढ होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे कोकण पट्ट्यातील काही भागांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.

दरम्यान, पुढील तीन दिवस कोकण प्रदेशातील मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण आणि दमट वातावरण राहणार असून गुरूवारी आणि शुक्रवारी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विदर्भात पावसाचा प्रभाव कमी

विदर्भात पावसाचा प्रभाव कमी होत असून पुढील काही दिवस या प्रदेशात कोरडे हवामान राहील, अशी शक्यता हवामान विभगाने व्यक्त केली आहे. विरदर्भातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मंगळवारी वर्धा येथे झाली. येथे ४३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. विदर्भात पुढील काही दिवसात कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

तर बुधवारपासून पुढील दोन दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे राज्यात पुढील काही दिवस बहुतांश भागात कोरडे हवामान राहणार असून तर कोकण पट्ट्यातील काही भागात उष्ण आणि दमट वातावरण तर काही भागात पावसाळी हवामान राहणार आहे. तर मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव यथे बुधवारी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला असून या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

मुंबईत मागील काही दिवसांपासून कमाल तापमान ३३ ते ३४ अंशाच्या दरम्यान नोंदले जात आहे. मात्र, आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने मुंबईकरांना घामाचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच दुपारच्या वेळेत उन्हाच्या चटक्यांचा सामनाही करावा लागत आहे. दरम्यान, बुधवारपासून पुढे मुंबईत उष्ण आणि दमट वातावरण राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईकरांना उष्ण आणि दमट वातावरणाचा त्रास सहन करावा लागणार आहे.

दरम्यान, मंगळवारी मुंबईत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३४.८ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३४.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शहरात बुधवारी कमाल तापामान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.