मुंबई : राज्यात सध्या पश्चिमी विक्षोभाची ( वादळाची ) स्थिती असून यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची तर काही भागात गारपिटीची नोंद होत आहे. तर विदर्भातील काही भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, पुढील चार दिवसांत कोकण पट्ट्यातील कमाल तापमानात वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यात सध्या एकाच वेळी पावसाळी हवामान आणि तीव्र उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. यामुळे राज्यात सध्या अस्थिर हवामान आहे. दरम्यान, पुण्यातील काही भागात बुधवारी गारपिटीसह पावसाची नोंद झाली. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून गुरुवारी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आदी भागांना हवामान विभागाकडून पावसासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर गुरुवारी विदर्भात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभगाने व्यक्त केला आहे.
पुढील चार दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र्र आणि मराठवाड्यातील कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. २३ ते २५ एप्रिलदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमान ४१ ते ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच या प्रदेशातील किमान तापमानात पुढील तीन दिवसांत २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
विदर्भात पारा ४१ ते ४३ अशांवर स्थिर असून गुरुवारी त्यात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून पुढील काही दिवस विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला आदी भागात उष्णतेची लाटसदृश्य स्थिती राहील, असा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी विदर्भातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद वर्धा येथे झाली. येथे ४४ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले. तर अकोला ४३.७, अमरावती ४३.२, चंद्रपूर ४३, गडचिरोली ४३.६, नागपूर ४२.८, तर यवतमाळ येथे ४३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच सध्या विदर्भात किमान तापमानातही वाढ झाली आहे.
उष्ण आणि दमट वातावरण कुठे ?
मुंबईतसह कोकणातील काही भागात मागील काही दिवसांपासून कमाल तापमानात काहीशी वाढ होत आहे. कोकण पट्ट्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद बुधवारी रत्नागिरी येथे झाली. येथे ३५.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. तर डहाणू ३४.८, कुलाबा ३३.१ आणि सांताक्रूझ येथे ३३.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद बुधवारी झाली. ठाणे, रायगड आणि रत्नागिरीत गुरुवारी उष्ण आणि दमट वातावरण राहील, तसेच दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या सरींची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबई शहरात गुरुवारी उष्ण आणि दमट वातावरण राहील, तर कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान २५ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
