मुंबईः कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर- गोकुळ कब्जा करण्यासाठी राज्य सरकारने गोकुळवर पाच संचालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील चार संचालकांना थेट मतदानाचाही अधिकार देण्यात आला असून आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. सरकारच्या निर्णयामुळे काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना मोठा धक्का बसला असून या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोकुळ दूध संघाची पंचवार्षित निवडणूक काही दिवसांपूर्वीच पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने महायुतीच्या दिग्गज नेत्यांसमोर कडवे आव्हान उभे करीत ही निवडणूक जिंकली. या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला १३ तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. सर्व ताकद पणाला लावूनही झालेला पराभव महायुतीच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला असून कोणत्याही परिस्थितीत गोकुळवर कब्जा करण्यासाठी सरकारने धावपळ सुरु केली आहे. गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी गेल्या आठवड्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीवर महायुतीच्या १२ संचालकांनी बहिष्कार टाकल्यानंतर सतेज पाटील गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर येत्या १० नोव्हेंबरला संचालक मंडळाची पुन्हा बैठक बोलाविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार गोकुळवर कब्जा करण्यासाठी कायदेशीर तरतूदींचा वापर करण्याच्या हालचाली शासनदरबारी सुरू झाल्या आहेत.
त्यानुसार सहकार कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव सहकार विभागाने आज मंत्रिमंडळासमोर मांडला यामध्ये गोकुळ सारख्या शिखर संस्थावर शासनाच्या माध्यमातून चार तज्ञ संचालक आणि एक उपनिबंधक दर्जाचा अधिकारी थेट संचालक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यातील शासन नियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला असून त्यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येणार नाही.मात्र हा निर्णय जिल्हा बँकांना लागू होणार नाही.
