मुंबई : मुंबई – कोल्हापूरदरम्यान धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईऐवजी खडकीपर्यंतच धावणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबईतील प्रवाशांना फटका बसणार असून, यापूर्वी मध्य रेल्वेने केलेला दावा खोटा ठरल्याची चर्चा रंगली आहे.

मुंबई – कोल्हापूरदरम्यान सुमारे ५१५ किमी अंतर असून १९९० पासून सुरू असलेली सह्याद्री एक्स्प्रेस ही कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. रोजगार, व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय उपचार, तसेच इतर कारणांसाठी कोल्हापूर, सांगली, मिरज व परिसरातील हजारो नागरिक नियमितपणे मुंबईकडे प्रवास करत असतात. परंतु, करोनाकाळात ही सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर भारतीय रेल्वेच्या शून्य आधारित वेळापत्रक धोरणामुळे सध्या ही रेल्वे फक्त कोल्हापूर – पुणे इतकीच मर्यादित स्वरूपात धावत आहे. आता ही रेल्वे पुण्याऐवजी खडकीपर्यंत चालवण्यात येणार आहे. मात्र कोल्हापूर – मुंबई ही मूळ सेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.

प्रवासी नाराज

सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १०, ११, १२, १३ आणि १४ चे विस्तारीकरण पूर्ण झाल्यानंतर सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा मुंबईपर्यंत सुरू करण्यात येईल, असा दावा मध्य रेल्वेकडून पूर्वी करण्यात आला होता. मात्र, हे काम पूर्ण होऊनही सह्याद्री एक्स्प्रेस अद्याप मुंबईत दाखल झालेली नाही. त्याऐवजी, ही रेल्वेगाडी खडकीपर्यंत मर्यादित ठेवण्यात येणार असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः कोल्हापूर, सातारा आणि पुणे परिसरातील प्रवाशांना मुंबईत थेट प्रवास करण्यासाठी पर्यायी वाहनांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

सामान्य नागरिकांवर भार

कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रातून दररोज अंदाजे २० ते २५ हजार प्रवासी मुंबईला येतात. थेट रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांना खासगी बस, मोटारीने महागडा प्रवास करावा लागतो. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढत आहे. तसेच प्रदूषणही वाढीत आहे. यासह रस्ते अपघातांचा धोका वाढला आहे.

एक्स्प्रेसच्या विस्ताराचा पुढील वर्षी विचार

सीएसएमटी फलाट क्रमांक १०, ११, १२, १३, १४ च्या विस्ताराचे काम प्रगतीपथावर आहे. भविष्यात रेल्वेच्या संचालनात सुधारणा व्हावी यासाठी, या ५ फलाटांची लांबी सध्याच्या १२ / १८ डब्यांवरून २४ डब्यांपर्यंत वाढवण्यात येईल. हे एक मोठे पायाभूत सुविधांचे काम सुरू आहे. आधीच इतर ५-६ मेल एक्स्प्रेस सीएसएमटीला न जाता दररोज दादर येथेच थांबतात. त्यामुळे सध्या नव्याने सुरू झालेली गाडी क्रमांक ०१०२३/२४ एक्स्प्रेस सीएसएमटी / दादरपर्यंत नेणे शक्य नाही. पुढील वर्षी फलाट विस्ताराचे काम पूर्ण झाल्यानंतर या रेल्वेगाडीच्या विस्ताराचा आढावा घेतला जाईल. अशा आशयाचे ट्विट मध्य रेल्वेच्या अधिकृत ”एक्स” (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर २८ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले होते.

सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा मुंबईपर्यंत सुरू करावी, अशी मागणी वारंवार रेल्वे प्रशासन व रेल्वे मंडळाकडे करण्यात येत आहे. मात्र, सीएसएमटी येथे फलाट उपलब्ध नसल्याने, गेल्या काही वर्षांपासून मुंबई – कोल्हापूरदरम्यान ही रेल्वेगाडी सुरू झालेली नाही. दरम्यानच्या काळात सीएसएमटी येथील नवीन फलाटांचा विस्तार झाला. पायाभूत सुविधा वाढविण्यात आल्या. तरीही सह्याद्री एक्स्प्रेस पूर्ववत झालेली नाही. – चंद्रकांत निकम, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सामाजिक प्रवासी संघ