क्रॉफर्ड मार्केट परिसरातील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी मंडईची इमारतीमधील मासळी विक्रेत्यांना ऐरोलीला स्थलांतरित होण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. इमारत धोकादायक असल्याने येथील मासळी विक्रेत्यांना पालिकेने थेट ऐरोली नाका येथे जाण्याचे फर्मान नोटिसद्वारे काढले आहे. मासेविक्री करणाऱ्या कोळी समाजाकडून या निर्णयाला विरोध असून त्यांच्यात संतापाचं वातावरण आहे. दरम्यान आज मच्छिमार महिलांनी यासंबंधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत मध्यस्थी करण्याची मागणी केली.

यावेळी राज ठाकरे यांनी पालिकेकडून कितीही नोटीस येऊ देत, तुम्ही मात्र अजिबात हलायचं नाही असा सल्ला दिला असून यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच पालिका आयुक्तांची भेट घेऊ असे आश्वासन दिले. ऐरोलीला गेल्यास आमचे गिऱ्हाईक तुटतील आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होऊन उपासमारीची वेळ येईल, असं कोळी बांधवांचं म्हणणे आहे. स्थलांतराच्या या निर्णयाला विरोध होत आहे.