मुंबई : मुंबईला ओडिसा राज्याशी जोडणाऱ्या प्रतिष्ठित आणि कायमच गर्दी असणाऱ्या कोणार्क एक्स्प्रेसमधील प्रवाशांना प्रवासादरम्यान झोपणे महागात पडत आहे. गेल्या वर्षात या एक्स्प्रेसमध्ये सर्वाधिक चोऱ्या झाल्या आहेत. सौराष्ट्र एक्स्प्रेस, हुसेनसागर एक्स्प्रेस,चैन्नई एक्स्प्रेससह अमरावती एक्स्प्रेस आणि देवगिरी एक्स्प्रेसमध्येही चोरांचा सुळसुळाट आहे.
लांब पल्याचा प्रवास आरामात, झोपुन करता यावा याकरिता प्रवासी मेल-एक्स्प्रेसने प्रवास करण्यास प्राधान्य देत असल्याने या गाड्यांना नेहमीच गर्दी असते. परंतु या मेल-एक्स्प्रेसचा प्रवास प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे. रात्रीच्या वेळी प्रवासी झोपलेले पाहून चोर प्रवाशांच्या सामानावर डल्ला मारतात. मुंबई-कोणार्क एक्स्प्रेस ही प्रवाशांच्या पसंतीची एक्स्प्रेस आहे.परंतु या एक्स्प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत. मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये, विशेषतः कल्याण – कसारा आणि कल्याण – कर्जत मार्गावर प्रवाशांच्या बॅगा आणि महिलांच्या पर्स चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
४४० गुन्ह्यांचा शोध
मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात २०२५ मध्ये मेल – एक्स्प्रेसमध्ये एकूण एक हजार ४५१ चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांत १३ कोटी ७१ लाख १९ हजार ०५२ रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. रेल्वे पोलिसांनी अवघ्या ४४० गुन्ह्यांचा शोध लावत २ कोटी १२ लाख ३७ हजार ३२८ रुपयांचा मुद्देमाल चोरांकडून हस्तगत केला आहे.
या गाड्यावर चोरांचे लक्ष्य
कोणार्क एक्स्प्रेस, सौराष्ट्र एक्स्प्रेस, हुसेनसागर एक्स्प्रेस, चेन्नई एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस, पंजाब मेल एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, अरवली एक्स्प्रेस व गुजरात मेल, एक्स्प्रेस.
अमरावती, देवगिरी एक्स्प्रेसमधील प्रवाशांनाही फटका
मुंबईला अमरावती आणि छ.संभाजी नगरशी जोडणाऱ्या अमरावती आणि देवगिरी एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या सामानावर चोर हात मारत आहेत. खिडकी जवळच्या आसनावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कल्याण स्थानकानंतर आरपीएफचे जवान खिडकी बंद करण्यास सांगतात. तसेच महिलांना गळ्यातील मंगळसूत्र आणि इतर दागिन्यांची, मोबाइलची काळजी घेण्यास सांगतात.
पहाटेच्या वेळी चोरी
चोरीऱ्या बहुतेक प्रकरणांमध्ये प्रवाशांची त्या गुन्हेगाराशी गाडीतच ओळख झालेली असते, किंवा प्रवासी गाढ झोपेत असताना चोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पहाटेच्या वेळी होणाऱ्या चोऱ्याची संख्या जास्त आहे.
रेल्वे पोलिसांची उपाययोजना
मेल-एक्स्प्रेसमधील चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी ५ अंमलदारांचे मनुष्यबळ गणवेषात नेमण्यात येते. तसेच गर्दीच्या वेळी फलाटावर गस्तीसाठी अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करण्यात येत आहे.
