मुंबई : होळी सणानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे पनवेल – रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या चालवणार आहे. तसेच दिवा – चिपळूण अनारक्षित विशेष रेल्वेगाडीही चालवण्यात येणार आहे. ही रेल्वेगाडी १ मार्चऐवजी २ मार्चपासून चालवण्यात येईल.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पनवेल – रत्नागिरी – पनवेल अनारक्षित विशेष रेल्वेगाडीच्या ६ फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०११५७ मेमू विशेष रेल्वेगाडी २७ फेब्रुवारीपासून धावण्यास सुरुवात झाली. तर, २८ फेब्रुवारी, १ मार्च रोजी पनवेल येथून दुपारी ४.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. तर, गाडी क्रमांक ०११५८ मेमू विशेष रेल्वेगाडी २७ फेब्रुवारीपासून धावण्यास सुरुवात झाली.

तर, २८ फेब्रुवारी, १ मार्च रोजी रत्नागिरी येथून सकाळी ९ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ४.१० वाजता पनवेलला पोहोचेल. या रेल्वेगाडीला सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, कामथे, सावर्डा, आरवली रोड, कडवई, संगमेश्वर रोड, उक्शी आणि भोके या स्थानकांत थांबा असेल. या रेल्वेगाडीला ८ मेमू डबे असतील.

गाडी क्रमांक ०११५९ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी १ मार्चऐवजी २ मार्च ते ८ मार्चदरम्यान दररोज रात्री ११.२५ वाजता दिवा येथून सुटेल आणि चिपळूण येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११६० अनारक्षित विशेष रेल्वेगाडी १ ते ८ मार्चदरम्यान दररोज दुपारी ३.३० वाजता चिपळूण येथून सुटेल आणि दिवा येथे त्याच दिवशी रात्री ११.१० वाजता पोहोचेल.

या रेल्वेगाडीला निळजे, तळोजा पाचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजणी येथे थांबा देण्यात येईल. या रेल्वेगाडीला ८ मेमू डबे असतील. या रेल्वेगाड्या अनारक्षित म्हणून चालवण्यात येतील आणि अतिजलद मेल/एक्स्प्रेसप्रमाणे सामान्य शुल्क आकारले जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या ४ विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. गाडी क्रमांक ०१००३ साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी २ मार्च आणि ९ मार्च रोजी सकाळी ८.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून आणि त्याच दिवशी मडगाव येथे रात्री ११.४० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१००४ साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १ मार्च आणि ८ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता मडगाव येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ५.५० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी येथे थांबे असतील. या रेल्वेगाडीला १८ शयनयान आणि २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन असतील.