मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई ते कोकण प्रवास अतिवेगवान करण्यासाठी ३८८ किमी लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गाची घोषणा होऊन बरीच वर्षे झाली असून प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली नाही. पण आता मात्र एमएसआरडीसीने हा प्रकल्प प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखड्याच्या कामाला वेग दिला आहे.

या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तीन महिन्यांत पूर्ण करून तो राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. दरम्यान, या महामार्गाला नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गाशी आणि विरार – अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेशी जोडणी दिली जाणार आहे. ही जोडणी नेमकी कुठे आणि कशी दिली जाणार, हे आराखडा अंतिम झाल्यानंतर स्पष्ट होईल.

मुंबई – कोकण वा गोवा रस्ते प्रवास आजघडीला अत्यंत त्रासदायक आणि अडचणींचा ठरतो. मुंबई – गोवा महामार्गाचे बांधकाम मागील कित्येक वर्षांपासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) सुरू आहे. पण हे काम काही केल्या पूर्ण होताना दिसत नसल्याने मुंबई – गोवा अतिजलद प्रवासाचे स्वप्न पूर्ण झालेले नाही.

एमएसआरडीसीने मुंबई – कोकण प्रवास अतिजलद करण्यासाठी आणखी एक कोकण द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर कोकण द्रुतगती महामार्ग बांधण्याची घोषणा २०२० मध्ये झाली. मात्र, अजूनही हा प्रकल्प कागदावरच आहे. या महामार्गाचे केवळ संरेखन अंतिम झाले असून मागील काही दिवसांपासून आराखड्याचे काम सुरू आहे. यासाठी आराखड्याचीही प्रतीक्षा आहे. पण आता मात्र हा प्रकल्प लवकरात लवकर प्रत्यक्ष मार्गी लावण्यासाठी एमएसआरडीसीकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. येत्या तीन महिन्यांत या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करून तो राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

४२०५.२१ हेक्टर जागेचे संपादन

अंतिम संरेखनानुसार हा प्रकल्प ३८८ किमीचा असून या महामार्गामुळे मुंबई – कोकण प्रवास तीन तासांत पार करता येणार आहे. या प्रकल्पासाठी ४२०५.२१ हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. या सहापदरी महामार्गाच्या बांधकामासाठी अंदाजे २५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाचा आराखडा पूर्ण करून त्यास मान्यता घेतल्यानंतर भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करून हा प्रकल्प शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.