मुंबई: कोकणातील हापूस आंब्याच्या आलेला मोहोर खराब हवामानामुळे काळा पडल्याने आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात येणार येतील. झालेल्या नुकसानीचा पंचानामा करून तत्काळ नुकसानभरपाई जाहीर केली जाईल, असे आश्वासन मंत्री भरत गोगावले यांनी आंबा बांगायतदारांच्या प्रश्नावर उपस्थित लक्षवेधीवर बोलताना दिले.

विपरित वातावरणामुळे कोकणातील आंबा मोहरावर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे आंब्याचे नुकसान झाले असून आंबा उत्पादक शेतकरी बँकांच्या कर्जदबावाखाली, मानसिक-आर्थिक तणावाखाली आंबा उत्पादक जगत आहेत. मात्र आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याबाबत शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला.

कोकणाचा महत्त्वाचा व्यवसाय असणारा आंबा उद्योग अवकाळी पाऊस, हवामान बदल, तीव्र धुक्यामुळे संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे, भाई जगताप यांनी विधान परिषदेत केली. यावर मंत्री भरत गोगावले यांनी कोकणच्या आंबा बागांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात येतील. त्याचप्रमाणे पिकविम्यांतर्गत नुकसानभरपाई देण्याबाबतही तत्काळ कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.

कोकणातील आंबा, काजू, फणस आणि कोकम यांच्या प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. आमदार सुनील शिंदे यांनी आंब्याला हमीभाव देण्याची मागणी केली. तसेच आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी केली. आमदार भाई जगताप यांनीदेखील नुकसानभरपाई वाढवून देण्याची मागणी केली. यावेळी प्रवीण दरेकर यांनीदेखील प्रक्रिया उद्योगांना तुटपुंजे अनुदान मिळत असून वाढीव अनुदान देण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे आंब्याला अन्य पिकांप्रमाणे हमीभाव मिळावा अशीही मागणी केली. यावर मंत्री गोगावले यांनी २०२५ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १०५.८८ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १०,५८३.६९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोकण विभागात ९०,८०० हेक्टर क्षेत्र बाधित असून त्यापैकी २,११५ हेक्टर क्षेत्र आंबा पिकाखाली आहे. आतापर्यंत कोकणासाठी ८६.७६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार नाशवंत फळपिकांना हमीभाव लागू नसल्याने आंब्याला हमीभाव देणे शक्य नसल्याचे सांगितले.