मुंबई: प्रतिकुल वातावरणाचा फटका आंबा व काजू बागायदतारांना बसला. पिकाच्या झालेल्या या नुकसान भरपाई मिळावी यासाठी या शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकसानभरपाई जाहीर करतील यासंदर्भात दिलेल्या आश्वासनाचीही पूर्तता झाली नाही. त्यामुळे आंब्याला हेक्टरी पाच लाख, काजूला तीन लाख नुकसानभरपाई द्या या मागणीसाठी उद्या शुक्रवारी कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढणार असल्याची माहिती स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली.

स्वातंत्र्य लढा असो की संयुक्त महाराष्ट्र लढा कोकणातील जनतेने यात सहभागी हाेत राज्याला दिशा दिली आहे. या मुंबई आणि कोकणात वास्तव्य करणाऱ्या मराठी माणसाला आता पाठिंब्याची आवश्यकता असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना (ठाकरे), जनता दल सेक्युल, मराठी अभ्यासकेंद्र या सर्वच संघटना या आंबा आणि काजू बागायतदारांच्या लढ्यात सहभागी झाल्या असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

मुंबई पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी दुपारी ३ वाजता मोठ्या संख्येने आंबा-काजू बागायतदारांसह कोकणी माणूस या मोर्चात सहभागी होईल. गिरगाव चौपाटीवर एकत्र जमल्यानंतर तिथून हा मोर्चा पायी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर रवाना हाेईल. यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन आंबा-काजू बागायतदारांना नुकसानभरपाई मिळायलाच हवी अशी भूमिका मांडली जाईल, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

कोकणातील मंत्र्यांचा निषेध

विनायक राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे दोघेही उपस्थित होते. या दोघांनाही कोकणातील बागायतदारांचा विषय माहीत असूनही त्यांनी या बैठकीत एक चकार शब्दही या बागायदारांसाठी काढलेला नाही. यांना काेकणातील जनतेशी काही देणेघेणे नसल्याची टीका शिवसेना (ठाकरे) नेते विनायक राऊत यांनी केली. महसूल विभागाने आंबा-काजूच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे आवश्यक होते.

मात्र ते करण्यात आलेले नाहीत. सरकारने एनडीआरएफकडे याविषयीचा प्रस्ताव पाठविण्याची आवश्यक असताना तोही पाठविण्यात आला नाही. कालच्या महसूलमंत्र्यांसाबेतच्या बैठकीत सर्व वस्तुस्थिती मांडण्यात आल्यानंतरही मुख्यमंत्र्यांकडून मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी कोणतेच आश्वासन देण्यात आले नाही. हे सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असल्याची टीका, विनायक राऊत यांनी केली. यावेळी जनता दल सेक्युलरचे प्रभाकर नारकर, मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार, माजी आमदार व आंबा बागायतदार संघटनेचे बाळ माने आदी उपस्थित होते.