मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर धावणारी तेजस एक्स्प्रेस विविध सुविधांनी परिपूर्ण अशी एक्स्प्रेस होती. त्यामुळे ती ब्रॅंड म्हणून ओळखली जात होती. अतिशय वेगवान, अत्याधुनिक सुविधा, पूर्णत: वातानुकूलित तेजस एक्स्प्रेस होती. परंतु, गेल्या काही कालावधीपासून सर्व सुविधांची चणचण प्रवाशांना भासत आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसचा बोऱ्या वाजला आहे. तेजस एक्स्प्रेस गुरुवारी तब्बल साडेनऊ तास विलंबाने धावत होतीे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड विलंबयातना सहन कराव्या लागल्या.

गाडी क्रमांक २२१२० मडगाव – सीएसएमटी एक्स्प्रेस गेल्या अनेक दिवसांपासून विलंबाने धावत आहे. ही रेल्वेगाडी नियोजित वेळापत्रकानुसार २ ते ५ तास उशिराने धावत आहे. तर, गाडी क्रमांक २२११९ सीएसएमटी – मडगाव तेजस एक्स्प्रेसही ३ ते ९ तास उशिराने धावत आहे. बुधवारी दुपारी ३.३५ वाजता सुटणारी मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस रात्री ११.१८ वाजता सुटली. ही एक्स्प्रेस नियोजित वेळेऐवजी तब्बल ७.४३ तास विलंबाने सुटली आणि सीएसएमटी येथे सकाळी ९.५४ वाजता पोहचली. ही रेल्वेगाडी सीएसएमटी येथे रात्री १२.३० वाजता पोहचणे आवश्यक होते.

ही एक्स्प्रेस तब्बल ९.२४ तास उशिराने धावल्याने, प्रवाशांचा खोळंबा झाला. तसेच अतिशय वेगवान तेजस एक्स्प्रेसचे तिकीट काढून रडतखडत प्रवास झाल्याने पैसेही वाया गेले. तेजस एक्स्प्रेस विलंबाने धावत असल्याने या रेल्वेगाडीच्या वेळापत्रकात सातत्याने बदल करण्यात येत आहे. दरम्यान, मध्य रेल्वेवरील पनवेल येथे ब्लाॅक सुरू असल्याने, कोकणातील रेल्वेगाड्या उशिराने धावत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली.

मध्य आणि कोकण रेल्वेवरून धावणारी मुंबई – मडगाव तेजस एक्स्प्रेसचे स्वयंचलित दरवाजे अर्धवटच बंद होणे, वायफाय आणि यूएसबी साॅकेट यासारख्या सुविधा बंद असतात. तसेच तेजस एक्स्प्रेसमधील जेवणाचा दर्जा देखील घसरल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.

अधिक पैसे देऊन जलद प्रवासासह अत्याधुनिक सुविधांचा लाभ मिळावा अशी प्रवाशांची अपेक्षा असते. मात्र, प्रवास जलद होत नसल्याने, प्रवासी तेजस एक्स्प्रेसबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. तसेच तेजस एक्स्प्रेसमध्ये सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांना दररोज गैरसोयीचा सामना करावा लागतो. याच मार्गावरून जनशताब्दी एक्स्प्रेस देखील धावत असून या एक्स्प्रेसचे तिकीट भाडे तेजसपेक्षा कमी आहे. मात्र तेजस एक्स्प्रेसमधील सुविधा बंदच असतील. तर, जनशताब्दीचा प्रवास आणि तेजसचा प्रवास यात काहीच फरक राहिलेला नाही, अशी खंत प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.