मुंबई : कोकण रेल्वेने विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी आणि तिकीटधारक प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत व आरामदायी प्रवास करता यावा यासाठी संपूर्ण कोकण रेल्वेवर व्यापक आणि सातत्यपूर्ण तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत एका वर्षात ३.६८ लाख विनातिकीट प्रवाशांना पकडून २०.२७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.

कोकण रेल्वे रोहा – ठोकूरदरम्यान एकूण ७४० किमीदरम्यान विस्तारला आहे. उत्तरेकडून विविध विभागातून आलेल्या रेल्वेगाड्यांना दक्षिणेत कोकण रेल्वेवरून जावे लागते. या कोकण रेल्वेवरून आठवड्याला ४३ ते ४५ नियमित रेल्वेगाड्या सुटतात. प्रत्येक रेल्वेगाडीतून साधारणपणे ३,५०० ते ४,००० प्रवासी प्रवास करतात. तसेच उन्हाळी हंगामात दररोज १ किंवा २ विशेष रेल्वेगाड्या धावतात. तसेच गणेशोत्सव काळात दररोज ६ ते ११ विशेष रेल्वेगाड्या धावतात. यावेळी प्रत्येक विशेष रेल्वेगाडीमधील प्रवाशांची संख्या ४ ते ५ हजारांवर जाते. या प्रत्येक रेल्वेगाडीत तिकीट तपासणी पथकाद्वारे तपासणी करण्यात आली.

जानेवारी – डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण ८,४८१ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. या मोहिमांमुळे अनधिकृत/अनियमित प्रवासाची ३ लाख ६८ हजार ९०१ प्रकरणे उघडकीस आली आणि दंडापोटी एकूण २०.२७ कोटी रुपये वसूल करण्यात आले. या विशेष मोहिमा रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) कर्मचारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेगाड्या आणि स्थानकांवर राबवण्यात येत आहेत.

कोकण रेल्वेने डिसेंबर २०२५ दरम्यान ९९८ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. ज्यामध्ये ४३,८९६ अनधिकृत आणि अनियमित प्रवासी आढळले. या प्रवाशांकडून रेल्वेचे देय भाडे आणि दंडापोटी २.४५ कोटी रुपये वसूल करण्यात आले.

प्रवाशांना कोणत्याही गैरसोयीपासून आणि दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन कोकण रेल्वेद्वारे करण्यात आले. सर्व तिकीटधारक प्रवाशांना सुरक्षित, सुव्यवस्थित आणि आरामदायी प्रवास घडावा यासाठी संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर कडक तिकीट तपासणी मोहीम सुरू आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.

कोकण रेल्वेवर पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळुर ते उडुपीदरम्यान धावली. रोहा – वीर – खेड – सावंतवाडी या मार्गाचे काम डिसेंबर १९९६ मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास एकूण ७ वर्षे ३ महिने कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर १९९८-९९ सालापासून कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यास सुरुवात झाली.