मुंबई : कोकण रेल्वेने देशांतर्गत रेल्वे प्रकल्पांसोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरही विस्तार सुरू केला आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये मेट्रो उभारणीचे काम लवकरच सुरू करण्याच्या दिशेने कंपनीची वाटचाल सुरू असून, श्रीलंकेतील पुलांचे पुनर्वसन आणि नव्या पुलांच्या बांधकामासाठीच्या निविदा प्रक्रियेतही कोकण रेल्वे सहभागी झाली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत मिळून गेल्या अडीच वर्षांत तब्बल २० हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे नवे प्रकल्प मिळवण्यात कंपनीला यश आले असून, सध्या २३ हजार ५५२ कोटी रुपयांचे प्रकल्प प्रगतिपथावर आहेत.

कंपनीने २०२५-२६ या आर्थिक वर्षात १९९.६३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. गेल्या अडीच वर्षांत २० हजार ५९ कोटी रुपयांचे नवे प्रकल्प मिळाले असून, विविध पायाभूत कामांना गती देण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पांतील सहभागामुळे कोकण रेल्वेच्या अभियांत्रिकी कौशल्याला जागतिक स्तरावर संधी उपलब्ध होत आहेत.

प्रवाशांच्या सोयी-सुविधांसाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात २०.७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आगामी पाच वर्षांत सुमारे १०५ कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन आहे. स्थानकांवर उद्वाहन, सरकते जिने, उंच फलाट, फलाटांचा विस्तार, स्पर्शसंवेदी फरशा व वातानुकूलित प्रतीक्षालये यासारख्या सुविधा विकसित केल्या जात आहेत. सर्व प्रवासी आरक्षण प्रणालीच्या (पीआरएस) तिकीट खिडक्यांवर यूपीआयद्वारे पैसे भरण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात येत आहे.

प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व पादचारी पुलांचे संरचनात्मक परीक्षण पूर्ण करण्यात आले असून, त्यापैकी २१ पुलांची दुरुस्ती करण्यात आली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत उन्हाळी हंगाम, गणेशोत्सव आणि अन्य गर्दीच्या काळात एकूण ६२९ विशेष गाड्या चालवण्यात आल्या. विनातिकीट प्रवाशांविरोधातील मोहिमांसह तिकीट तपासणीतून १५.०४ कोटी रुपये महसूल मिळाला.

कोकणातील मालवाहतुकीला चालना

मालवाहतूक आणि शीतसाखळी सुविधांच्या विस्तारावरही भर देण्यात येत आहे. रत्नागिरी येथे कंटेनर सायडिंग आणि शीतगृह विकसित केले जात असून, खेड, चिपळूण, सिंधुदुर्ग, कुडाळ, झारप, मुरुडेश्वर आणि माणकी स्थानकांवर शीतसाखळी सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कृषी उत्पादनांच्या साठवणुकीसह वाहतुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

सीधी बात

कर्मचाऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी राबविण्यात आलेल्या ‘सीधी बात’ उपक्रमांतर्गत सहा सत्रांमध्ये २९ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. मंजूर १९० पदांची भरती पूर्ण झाली असून, सुरक्षा विभागातील २०१ पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. चालू आर्थिक वर्षात आणखी सुमारे ४०० रिक्त पदे भरण्याचे नियोजन आहे. चालू आर्थिक वर्षात चार प्रमुख पुरस्कार मिळवणाऱ्या कोकण रेल्वेने गेल्या अडीच वर्षांत विविध क्षेत्रांत एकूण १३ पुरस्कार पटकावले आहेत.