मुंबई : इंधन बचत, प्रदूषण टाळणे यासह मेल, एक्स्प्रेस गाडीला डिझेल लोको जोडण्याच्या कटकटीतून सुटका करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर नुकतेच विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर  कोकण रेल्वेने १ मे चे औचित्य साधून पहिल्या टप्प्यात दहा गाडय़ा विजेच्या इंजिनाने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मांडवी, जनशताब्दी, कोकणकन्या, मत्स्यगंधा, नेत्रावती, मंगला एक्स्प्रेसचा समावेश आहे.

 यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास प्रदूषणमुक्त तसेच वेगवान होईल. रोहा ते ठोकूर असा ७०० किलोमीटरचा कोकण रेल्वेचा मार्ग आहे. या पट्टय़ातील विद्युतीकरणाचे काम २०१५ पासून हाती घेण्यात आले. विद्युतीकरणाचे काम सहा टप्प्यात हाती घेतले होते. रोहा ते रत्नागिरी, बिजूर ते ठोकूर, कारवार ते बिजूर, कारवार ते वेरणा, वेरणा ते थिविम आणि रत्नागिरी ते थिविम असे टप्पे होते. या सर्व टप्प्यांची कामे पूर्ण करण्यात आली. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते थिविम या शेवटच्या टप्प्यातील विद्युतीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले. विद्युतीकरण नसल्यामुळे एखाद्या पट्टय़ात लांब पल्ल्याच्या गाडय़ा धावताना समस्या येत होती. मध्य रेल्वेच्या रोहा स्थानकापर्यंत विद्युतीकरण असल्याने विजेवरील लोको मेल, एक्स्प्रेस गाडय़ांना जोडल्या जात होत्या. त्यापुढे विद्युतीकरण नसल्याने डिझेलवरील लोको जोडून मेल, एक्स्प्रेस चालवण्याशिवाय पर्याय नव्हता. ही समस्या आता दूर झाली आहे.

 विजेचे इंजिन जोडून मंगळुरू सेंटर ते मडगाव पॅसेंजर विशेष, तिरुवंनतपुरम ते निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, मडगाव ते निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेससह मंगला एक्सप्रेस, मांडवी, जनशताब्दी, कोकणकन्या, मत्स्यगंधा, नेत्रावती एक्स्प्रेस या गाडय़ा चालवण्यात येणार आहेत.