मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत कमी रेल्वेगाड्या धावत असल्याने, अनेक रेल्वेगाडीत प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे प्रवाशांची प्रवासात गैरसोय होते. त्यामुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येते. परंतु, विशेष रेल्वेगाडीची कालमर्यादा काही महिन्यांपूर्ती असल्याने त्या बंद होतात. परंतु, कोकण रेल्वेवरील जबलपूर – कोईम्बतूर रेल्वेगाडीची मुदत पाच वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०२१९८ / ०२१९७ जबलपूर जंक्शन – कोईम्बतूर जंक्शन – जबलपूर जंक्शन साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या सेवांमध्ये विस्तार केला आहे. पश्चिम मध्य रेल्वेशी समन्वय साधून, गाडी क्रमांक ०२१९८ / ०२१९७ जबलपूर जंक्शन – कोईम्बतूर जंक्शन – जबलपूर जंक्शन साप्ताहिक विशेष गाडीच्या सेवा, सध्याचे धावण्याचे दिवस, वेळा, थांबे आणि रचनेत कोणताही बदल न करता, तिच्या कालावधीत पाच वर्षांची वाढ केली आहे. गाडी क्रमांक ०२१९८ जबलपूर जंक्शन – कोईम्बतूर जंक्शन साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी दर शुक्रवारी धावते. या रेल्वेगाडीला ६ मार्च २०२६ पासून २७ डिसेंबर २०३० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०२१९७ कोईम्बतूर जंक्शन – जबलपूर जंक्शन साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी दर सोमवारी धावते. या रेल्वेगाडीला ९ मार्च २०२६ पासून ३० डिसेंबर २०३० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मध्य प्रदेश आणि तमिळनाडूला जोडणारी जबलपूर जंक्शन – कोइम्बतूर जंक्शन रेल्वेगाडी पश्चिम मध्य रेल्वेद्वारे चालवली जाते. ही गाडी मध्य आणि दक्षिण भारतातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा दुवा ठरली आहे.
या रेल्वेगाडीच्या प्रवासासाठी साधारणपणे तीन दिवसांचा कालावधी लागतो. ही रेल्वेगाडी विशेष रेल्वेगाडी म्हणून चालवण्यात येत असून, तिच्या परिचालन कालावधीत अनेक वेळा वाढ केली आहे. तर, आता थेट डिसेंबर २०३० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या रेल्वेगाडीला प्रचंड मागणी असल्याचे निदर्शनास आले आहे. या रेल्वेगाडीला प्रथम वातानुकूलित श्रेणी, द्वितीय वातानुकूलित श्रेणी, तृतीय वातानुकूलित श्रेणी, शयनयान, सामान्य डबे अशी संरचना आहे. त्यात वेळोवेळी वाढ करण्यात आली आहे. या रेल्वेगाडीला इटारसी जंक्शन, खांडवा जंक्शन, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, पनवेल, मडगाव जंक्शन, मंगळुरू जंक्शन, शोरानूर जंक्शन, पलक्कड जंक्शन हे प्रमुख थांबे आहेत. तर, कोकण रेल्वे मार्गावरील रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, थिवि, कारवार, कुमटा, मुकांबिका रोड बायंदूर (एच), कुंदापुरा, उडुपी, मुल्की येथे थांबा आहे.
