मुंबई : मुंबईतून थेट गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा गोव्याच्य दिशेने प्रवास सुरू होतो. या प्रवाशांच्या सोयीसाठी एलटीटी ते करमळी धावणाऱ्या रेल्वेगाडी मडगावपर्यंत धावेल. या रेल्वेगाडीचा शेवटचा थांबा करमळीऐवजी मडगाव असेल. त्यामुळे प्रवाशांना मडगाव येथून गोव्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी कमी वेळेत आणि कमी खर्चात पोहचणे शक्य होणार आहे.

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक २२११५/२२११६ लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-करमळी-लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ही साप्ताहिक वातानुकूलित अतिजलद एक्स्प्रेस मडगाव जंक्शन पर्यंत विस्तारित केली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार हा विस्तार १६ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आला असून, यामुळे मुंबई ते थेट मडगाव असा प्रवास सोयीचा झाला आहे.

गाडी क्रमांक २२११५ लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते मडगाव वातानुकूलित अतिजलद एक्स्प्रेस गुरुवारी धावते. एलटीटीवरून ही रेल्वेगाडी रात्री १२.५० वाजता सुटते आणि मडगाव येथे सकाळी ११.१५ वाजता पोहचेल. तर, मडगाव येथून ही रेल्वेगाडी दुपारी १.५० वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी एलटीटी येथे रात्री १२.१० वाजता पोहचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, करमळी आणि शेवटी मडगाव असे थांबे असतील. कोकण आणि गोव्यात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही रेल्वेगाडी फायदेशीर ठरणार आहे.

गेल्या अनेक कालावधीपासून या रेल्वेगाडीचा करमळीऐवजी मडगाव असा शेवटचा थांबा करण्यात येत होता. कोकण रेल्वेने या रेल्वेगाडीच्या मडगाव स्थानकापर्यंत विस्तार १२ फेब्रुवारीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तर, आता पुन्हा यात सुधारणा केली असून मडगाव जंक्शन स्थानकापर्यंतचा विस्तार १६ एप्रिल पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

दादर-हुबळी एक्स्प्रेस आता एलएचबी डब्यांसह धावणार

प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचा प्रवास अधिक चांगला होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक १७३१८/१७३१७ दादर-हुबळी- दादर एक्स्प्रेसचे आयसीएफ डब्ब्यांचा रेक बदलून त्याऐवजी एलएचबी डबे वापरण्याचा निर्णय घेतला आहे. एलएचबी डब्यांच्या सुधारित संरचनेसह ही रेल्वेगाडी दादर येथून २५ फेब्रुवारीपासून आणि हुबळी येथून २४ फेब्रुवारीपासून धावणार आहे. या रेल्वेगाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी डबा, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी डबा, ७ शयनयान डबे, ३ सामान्य द्वितीय श्रेणी डबा, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन असे डबे असतील.