मुंबई : मागील आर्थिक वर्षात कोकण रेल्वेने तिकीट तपासणीत आणि प्रवासी सुविधेत वाढ केली. कोकण रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढल्याने तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास वाढला होता. या प्रवाशांची धरपकड करण्यासाठी विविध मोहीम राबवून, कोकण रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये २७.५९ कोटी रुपयांची दंडवसुली केली. तसेच कोकण रेल्वेवरील पादचारी पूल, वातानुकूलित लाऊंज, डीजी लाॅकर आणि अपंग प्रवाशांसाठी सुविधा वाढवल्या.

कोकण रेल्वेने मागील आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत प्रवासी वाहतूक, सेवा आणि सुरक्षिततेच्या क्षेत्रात विक्रमी यश नोंदवले. राज्यातील कोकणपट्टा ते गोव्यातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम केले. मागील आर्थिक वर्षात पायाभूत सुविधांच्या दृष्टीनेही महत्वाचे प्रकल्प आणि कामे करण्यात आली आहेत. त्यात पूल, बोगदे आणि सिग्नल प्रणालींचे आधुनिकीकरण करून सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढवण्यात आली. तसेच ड्रोनच्या मदतीने रेल्वे मार्गावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

मडगाव स्थानकावर सुधारणा करून त्याची कार्यक्षमता वाढवण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी विविध सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. अपंग प्रवाशांसाठी रॅम्प तयार करणे, अंध प्रवाशांसाठी ब्रेल लिपीमध्ये फलके लावली आहेत. यासह रत्नागिरी, सावंतवाडी रोड स्थानकांवर वातानुकूलि लाउंज, रेल आर्केड, डीजी लॉकर सुविधा सुरू केल्या आहेत. ज्या स्थानकात शेड, फलाट उंच करण्याची आवश्यकता होती, त्या स्थानकात तशाप्रकारे अत्यावश्यक बदल केले आहेत. तसेच पादचारी पूल उभे केले आहेत.

कोकण रेल्वे प्रशासनाद्वारे गणेशोत्सव काळात प्रवाशांसाठी आरोग्य सेवा, मोफत पाणी वाटप करणे अशा उपक्रमाचे आयोजन केले. या सर्व उपक्रमांमुळे कोकण रेल्वेने प्रवासी-केंद्रित सेवा, सुरक्षितता आणि विकास यामध्ये महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, भविष्यातही अशाच प्रकारे प्रगती सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच ‘देव दर्शन विशेष ट्रेन’सह अनेक नवीन सेवा सुरू केल्या. रांजणगाव, अयोध्या आणि रामेश्वरम यांना जोडणाऱ्या सहा विशेष गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय गणपती, उन्हाळा आणि हिवाळा हंगामात १,४०० विशेष गाड्या चालवण्यात आल्या. ज्यात ३७६ गणपती विशेष रेल्वेगाड्या, १८५ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या, ८६ हिवाळी विशेष रेल्वेगाड्या, ३८ एफटीआर रेल्वेगाड्या आणि ७१५ इतर विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात आल्या. याचा लाखो प्रवाशांना लाभ झाला आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.

रो-रो वहन क्षमता ५० मेट्रिक टनांवरून ५७ मेट्रिक टनांपर्यंत वाढवली. ज्यामुळे मालवाहतुकीची कार्यक्षमता सुधारली. एकूण ९२ चोरीच्या घटना यशस्वीरित्या नोंदवण्यात आल्या. ज्यामुळे ३५.७३ लाख रुपये किमतीची चोरीची मालमत्ता जप्त केला. पळून गेलेल्या ९० मुलांना यशस्वीरित्या स्वगृही पाठवणी करण्यात आली. ज्यामुळे प्रवासी सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी अधिक दृढ झाली. कारवार आणि रत्नागिरी परिसरात अंदाजे २,७०० मीटर लांबीचे कुंपण तयार करण्यात आले. यामुळे रेल्वे मार्गात गुरे येण्यास मज्जाव केला. ३.६७ लाख किलोवॅट तास सौर ऊर्जा निर्माण केली. ज्यामुळे अंदाजे ४५.९४ लाख रुपयांची बचत झाली, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.