गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेने कोकणासाठी ६० विशेष गाडय़ांची घोषणा केली असली, तरी यापैकी एकाही गाडीला दिवा स्थानकात थांबा देण्यात आलेला नाही. प्रवाशांची तशी मागणी असली तरी विलंबाचे कारण पुढे करत रेल्वे प्रशासनाने थांबा देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दिवा स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडय़ांना थांबा दिल्यास उपनगरीय सेवेचे वेळापत्रक कोलमडते. काही प्रवाशांच्या सोयीसाठी लाखो प्रवाशांची गैरसोय करता येणार नाही, या मुद्दय़ावर रेल्वे प्रशासनाने थांबा नाकारला आहे. विशेष म्हणजे दादर-रत्नागिरी पॅसेंजरचा प्रवास सर्वाधिकवेळा दिव्यातच खंडित केला जात असताना आणि तिथूनच ती गाडी परतीच्या प्रवासाला सोडून प्रवाशांचे हाल वाढविताना रेल्वेला हा युक्तिवाद आठवत नाही!
बदलापूर, आसनगाव, टिटवाळा, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, वसई  भागांतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता या गाडय़ांना दिवा स्थानकात थांबा देण्याची मागणी विविध प्रवासी संघटनांनी केली आहे. ती रेल्वेने मात्र धुडकावली आहे.
दिवा स्थानकात लांबपल्ल्याची एक गाडी थांबवल्यास रेल्वे फाटक तेवढा वेळ बंद राहाते. फाटक बंद करण्यास दहा मिनिटांचा कालावधी लागतो. एका लांबपल्ल्याच्या गाडीमुळे दहा मिनिटे फाटक उघडे राहिल्यास तब्बल १५० ते २०० सेवांना त्याचा फटका बसू शकतो, असा युक्तिवाद मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी केला आहे.
रेल्वेच्या सोयीनुसार रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी दिवा स्थानकात रद्द केली जाते, त्या वेळी रेल्वेला विलंबाच्या गोष्टी आठवत नाहीत का?
आमदार रवींद्र चव्हाण