मुंबई : मुंबईस्थित कोकणवासियांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणातील मूळगावी जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी अनेक जण नियमित रेल्वेगाड्यांची तिकीटे काढत आहेत. परंतु, रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी हजारपार जात असल्याने, प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळणे कठीण झाले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या दोन विशेष रेल्वेगाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. आता वास्को द गामा – मुझफ्फरपूर ऑगस्टपर्यंत, तर उधना जंक्शन-मंगळुरू सप्टेंबरपर्यंत धावणार आहेत.

पावसाळी हंगाम आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाड्यांवरील गर्दीचा भार विभाजित करण्यासाठी, कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर एक्स्प्रेस २५ ऑगस्टपर्यंत दर सोमवारी वास्को द गामा येथून दुपारी ४ वाजता सुटेल.

ही रेल्वेगाडी तिसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता मुझफ्फरपूर जंक्शनला पोहोचेल. गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर जंक्शन – वास्को द गामा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २८ ऑगस्टपर्यंत दर गुरुवारी मुझफ्फरपूर जंक्शनहून दुपारी २.४५ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी तिसऱ्या दिवशी दुपारी २.५५ वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.

थांबे कुठे-कुठे

वास्को द गामा – मुझफ्फरपूर एक्स्प्रेस मडगाव, थिवि, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, मनमाड, भुसावळ, खंडवा जंक्शन, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर येथे थांबेल. या रेल्वेगाडीला एकूण २० एलएचबी डबे असतील.

उधना – मंगळुरू विशेष रेल्वेगाडी

गाडी क्रमांक ०९०५७ / ०९०५८ उधना जंक्शन – मंगळुरू जंक्शन – उधना जंक्शन द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी धावेल. गाडी क्रमांक ०९०५७ उधना जंक्शन – मंगळुरू जंक्शन द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी २८ सप्टेंबरपर्यंत धावेल. ही रेल्वेगाडी दर बुधवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता उधना जंक्शन येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०९०५८ मंगळुरू जंक्शन – उधना जंक्शन द्वि-साप्ताहिक विशेष मंगळुरू जंक्शन येथून निघेल. ही रेल्वेगाडी २९ सप्टेंबरपर्यंत धावेल. ही रेल्वेगाडी दर गुरुवारी आणि सोमवारी रात्री ११.१० वाजता मंगळुरू जंक्शन येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.०५ वाजता उधना जंक्शन येथे पोहचेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थांबे कुठे-कुठे

उधना जंक्शन – मंगळुरू रेल्वेगाडीला वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल या स्थानकांवर थांबा असेल. या रेल्वेगाडीला एकूण २२ डबे असतील.