मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी कोकण रेल्वेने व्यापक नियोजन केले आहे. विशेष गाड्यांसह वैद्यकीय सुविधा, २४ तास प्रवासी मदत केंद्रे, गर्दी व्यवस्थापन आणि सांस्कृतिक उपक्रमांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

कोकण रेल्वेने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने उधना, विश्वामित्री, वलसाड, वडोदरा, नागपूर, मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), वांद्रे टर्मिनस, दिवा, पनवेल येथून चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडगाव आणि ठोकूरपर्यंत विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची व्यवस्था केली आहे.

वैद्यकीय सुविधा, २४ तास प्रवासी मदत केंद्रे

माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर १२ सप्टेंबरपासून प्रथमोपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. चिपळूण आणि रत्नागिरी येथील आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. याशिवाय मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे, रक्तदाब व रक्तशर्करा तपासणी आणि रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या स्थानकांवर रेल यात्री सहायता केंद्रे २४ तास कार्यरत राहतील. तर स्थानकांवर पूर्वमुद्रित यूटीएस तिकिटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष उपाय – प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेऊन माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर स्वतंत्र विश्रांती थांबा तयार करण्यात येणार आहे.

  • तिकीट खिडक्यांवर विशेष रांग व्यवस्था, सातत्याने उद्घोषणा, विशेष तिकीट तपासणी मोहीम आणि स्थानकांच्या स्वच्छतेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.
  • रेल्वे स्थानकांवरील आणि रेल्वेगाड्यांमधील गर्दी नियंत्रणासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणावर २४ तास देखरेख ठेवण्यात येणार आहे. रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

रेल्वे स्थानकांवर गणेशोत्सवाचा जल्लोष

गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांसाठी प्रमुख स्थानकांवर पूजा साहित्य, फुले, फळे, काजू मोदक आदींचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे स्थानिक कलाकारांसाठी भजन, जाखडी, संगीत, कठपुतळी प्रयोग, कराओके आदी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोफत व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सेल्फी पॉइंट, आकर्षक रांगोळी, रोषणाई, ड्रोनद्वारे पुष्पवर्षाव, ट्रम्पेट वादन, लहान मुलांसाठी फुगे व रंगीत पेन्सिल; तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मोफत पाणी आणि वैद्यकीय शिबिरांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.