मुंबई : कोकण रेल्वे मार्गाच्या देखभाल, दुरूस्तीसाठी ब्लॉक घेण्याची मालिका सुरू आहे. आता कोकण रेल्वेवरील निवसर ते राजापूर रोड विभागादरम्यान १० मे रोजी ब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी सावंतवाडी रोड – दिवा, सीएसएमटी – मडगाव जनशताब्दी, सीएसएमटी – मडगाव तेजस एक्स्प्रेस खोळंबणार आहे.

कोकण रेल्वेने गोव्यातील माजोर्डा आणि मडगाव या विभागादरम्यान २ ते २९ मेदरम्यान ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे एलटीटी – तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेस, वास्को दा गामा-यशवंतपूर एक्स्प्रेस, हापा-मडगाव, या डाऊन दिशेकडील आणि अप दिशेकडे मडगाववरून येणाऱ्या बहुतांश सर्वच रेल्वेगाड्यांना फटका बसत आहे. कोकण रेल्वेने शुक्रवारी, १० मे रोजी सकाळी ९.१० ते ११.४० या कालावधीत निवसर ते राजापूर रोडदरम्यान २.३० तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. यावेळी गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेस सावंतवाडी रोड स्थानकातून सकाळी ८.४० वाजता सुटण्याऐवजी सकाळी ९.२५ वाजता सुटेल. कोकण रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे दिवा येथे ही रेल्वेगाडी उशिराने पोहचेल.

हेही वाचा…शिवाजी पार्क मैदानातील सभेसाठी मनसेला परवानगी, १७ मे रोजी भाजप आणि महायुतीचा मेळावा

गाडी क्रमांक १२०५१ सीएसएमटी – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस रत्नागिरी – निवसर दरम्यान ३० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. जनशताब्दी एक्स्प्रेसचा एकूण प्रवास कालावधी ९ तास २० मिनिटांचा असून गेल्या काही दिवसांपासून ही रेल्वेगाडी १५ ते ६० मिनिटे विलंबाने पोहचत आहे. तर, शुक्रवारीही प्रवाशांना लेटलतीफ कारभाराला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. गाडी क्रमांक २२११९ सीएसएमटी – मडगाव तेजस एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकादरम्यान २० मिनिटे थांबविण्यात येईल. सीएसएमटी – मडगाव तेजस एक्स्प्रेस ८ मे रोजी १ तास ३२ मिनिटे विलंबाने धावली. तसेच शुक्रवारीही याची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत.