मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील मुसळधार पाऊस, घाट विभागातील वेगमर्यादा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून मध्य रेल्वेने पावसाळी विशेष वेळापत्रकातील बदलाची माहिती जाहीर केली आहे. मध्य रेल्वेवरून सुरू होणाऱ्या, मध्य रेल्वेवर थांबणाऱ्या; तसेच मध्य रेल्वेमधून जाणाऱ्या कोकण मार्गावरील रेल्वेगाड्यांसाठी १५ जूनपासून हे वेळापत्रक लागू होणार असून ते २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत कार्यरत राहणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधून जाणाऱ्या या मार्गावर खोल दऱ्या, बोगदे, उंच पूल, भूस्खलनाचा धोका आणि जोरदार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरक्षित रेल्वे वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येते.
या सुधारित वेळापत्रकानुसार अनेक महत्त्वाच्या गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक २२२२९ / २२२३० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस आता सुधारित वेळेनुसार धावणार असून सीएसएमटीहून सकाळी ५.२५ वाजता सुटून मडगावला सायंकाळी ४ वाजता पोहोचेल. तर, परतीच्या प्रवासात मडगावहून दुपारी १२.२० वाजता सुटून रात्री १०.३० वाजता सीएसएमटी पोहोचेल.
गाडी २२११९ / २२१२० तेजस एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२०५१ / १२०५२ जनशताब्दी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १०१०३ / १०१०४ मांडवी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११००३ / ११००४ तुतारी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२६१९ / १२६२० मत्स्यगंधा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १६३४५ / १६३४६ नेत्रावती एक्स्प्रेस, गरीब रथ, दुरंतो आणि तिरुवनंतपुरम, एर्नाकुलम, मंगळुरू, तिरुनेलवेली, सावंतवाडी, रत्नागिरी आणि नागपूरला जाणाऱ्या गाड्यांच्या वेळांमध्येही बदल करण्यात आला आहे.
पावसाळ्यात काही रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांमध्येही कपात करण्यात आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस पूर्वी आठवड्यातून सहा दिवस धावत होती. मात्र पावसाळी वेळापत्रकात ती आता आठवड्यातून फक्त तीन दिवस चालविण्यात येणार आहे. सीएसएमटी – मडगाव वंदे भारत १५ जून ते १९ ऑक्टोबरदरम्यान सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी धावेल. तर, मडगाव – सीएसएमटी वंदे भारत मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी चालविण्यात येईल. तेजस एक्स्प्रेसच्या फेऱ्यांमध्येही कपात करण्यात आली आहे. सीएसएमटी – मडगाव तेजस एक्स्प्रेस पावसाळ्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी धावेल. तर, मडगाव – सीएसएमटीची तेजस एक्स्प्रेस बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी चालविण्यात येईल.
गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एक्स्प्रेस पूर्वी आठवड्यातून चार दिवस धावत होती. मात्र आता ती शुक्रवार आणि रविवार या दोनच दिवशी चालवली जाणार आहे. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक १११०० मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस शनिवार आणि सोमवारी धावेल.
पुणे – एर्नाकुलम एक्स्प्रेस, नागपूर – मडगाव एक्स्प्रेस, दिवा – रत्नागिरी पॅसेंजर, दिवा – सावंतवाडी रोड एक्स्प्रेस अशा अनेक गाड्यांच्या वेळांमध्येही बदल करण्यात आले आहेत. घाट विभागातील वेगमर्यादा आणि सुरक्षा उपायांमुळे काही गाड्यांचा प्रवास कालावधी वाढण्याची शक्यता असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
