मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीच्या काळात आणि २३ ते २६ जानेवारी २०२६ या सलग सुट्टीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर प्रवासी, पर्यटकांची गर्दी वाढण्याची चिन्हे आहेत. सलग सुट्टीच्या कालावधीत मुंबई ते सावंतवाडी रोड, चिपळूण विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची मागणी कोकणी प्रवाशांनी केली.

दरवर्षी या काळात, कौटुंबिक भेटीगाठी, पर्यटन आणि सार्वजनिक सुट्ट्यांमुळे मुंबई आणि पुणे येथून कोकण-सिंधुदुर्ग जिल्ह्यांकडे प्रवाशांची गर्दी वाढते. या मार्गावरील नियमित रेल्वेगाड्या आठवड्याभराआधीच पूर्णपणे आरक्षित होतात. ज्यामुळे मोठ्या संख्येने प्रवासी अडकून पडतात किंवा त्यांना असुरक्षित आणि महागड्या रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. या पार्श्वभूमीवर मुंबई ते सावंतवाडी रोड, पुणे ते सावंतवाडी रोड, मुंबई ते चिपळूण विशेष रेल्वेगाडी चालवण्यात यावी, अशी मागणी कोकण विकास समितीने रेल्वे मंडळाकडे केली आहे.

सीएसएमटी-सावंतवाडी रोड-सीएसएमटी

प्रस्तावित थांबे
दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप

प्रस्तावित डब्यांची रचना
शयनयान, वातानुकूलित तृतीय श्रेणी, वातानुकूलित द्वितीय श्रेणी

पुणे-सावंतवाडी रोड-पुणे

प्रस्तावित थांबे
चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कर्जत, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप

प्रस्तावित डब्यांची रचना
शयनयान, वातानुकूलित तृतीय श्रेणी, वातानुकूलित द्वितीय श्रेणी

सीएसएमटी-चिपळूण-सीएसएमटी

प्रस्तावित थांबे
दादर, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी

प्रस्तावित डब्यांची रचना
द्वितीय श्रेणी आसनी, वातानुकूलित आसनी डबा

विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्याने होणारे फायदे

  • कोकणकडे जाणाऱ्या सध्याच्या रेल्वेगाड्यांवरील गर्दी कमी होईल.
  • वाढीव मागणीच्या काळात सुरक्षित आणि परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध होतील.
  • भारतीय रेल्वेला अतिरिक्त महसूल मिळेल.

आवश्यक परवानग्या आणि मार्गवाटप लवकरात लवकर मंजूर केले जावेत. जेणेकरून प्रवाशांना तिकिटे खूप आधीपासून उपलब्ध करून देता येतील आणि प्रवाशांना शेवटच्या क्षणी होणारा त्रास टाळता येईल. कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रवाशांच्या व्यापक हितासाठी या प्रलंबित आणि वारंवार होणाऱ्या सार्वजनिक मागणीचा योग्य विचार करतील – जयवंत दरेकर, अध्यक्ष, कोकण विकास समिती.