मुंबई : भारतीय रेल्वेतर्फे देशातील विविध भागात तेजस एक्स्प्रेस २०१७ साली चालविण्यास सुरुवात केली. मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते गोवा अशी मे २०१७ साली तेजस एक्स्प्रेस सुरू केली. तेजस एक्स्प्रेसला सुरुवातीपासून खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु, गेल्या काही कालावधीपासून तेजस एक्स्प्रेसचा घसरलेला वक्तशीरपणा, असुविधाजनक प्रवासामुळे प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा झाला आहे. प्रीमियम, अतिजलद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसचा प्रवास दर्जाहीन आणि वेळखाऊ झाला आहे.

तेजस एक्स्प्रेस जास्तीत जास्त २०० किमी/तास वेगाने धावण्यासाठी तयार केलेली आहे. पूर्वी ही एक्स्प्रेस अतिशय वेगवान म्हणून ओळखली जात होती. तसेच यात प्रवाशांना अनेक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवासी तेजस एक्स्प्रेसकडे वळाले होते. परंतु, तेजस एक्स्प्रेस सध्या सातत्याने होणारा विलंब, तांत्रिक बिघाड, निकृष्ट दर्जाची सेवा आणि जास्त तिकीट दर याबाबी प्रवाशांना त्रासदायक होऊ लागल्या आहेत.

अनेक वेळा प्रवाशांनी तक्रारी करून देखील त्यावर उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने प्रवासी तेजस एक्स्प्रेसच्या प्रवासाने त्रस्त झाले आहेत. गाडी क्रमांक २२११९/२२१२० सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस सीएसएमटीहून पहाटे ५.५० वाजता सुटते आणि मडगाव येथे दुपारी ३ वाजता पोहोचते.

मडगावहून परतीचा प्रवास दुपारी ३.३५ वाजता सुरू होऊन सीएसएमटीत रात्री १२.३० वाजता पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, सातत्याने ३ ते ८ तास तेजस एक्स्प्रेस उशिराने धावते. ज्यामुळे प्रवाशांना गैरसोय होते. तसेच इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि स्वयंचलित दरवाजे अनेकदा बंद असतात किंवा व्यवस्थित काम करत नाहीत. त्यामुळे प्रीमियम तिकीट दर असूनही मिळणारी सुविधा वाईट असल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.

तेजस एक्स्प्रेसचे उद्घाटन करताना घोषित केलेल्या काही सुविधा आता उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तेजस एक्स्प्रेसचा वक्तशीरपणा बिघडल्याने, रेल्वे मंडळाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच आता तेजस एक्स्प्रेसचा रेक बदलून त्याजागी वंदे भारत एक्स्प्रेसचा रेक वापरावा. त्यानंतर तेजस एक्स्प्रेसच्या रेकची संपूर्ण दुरूस्ती करून तो रेक वंदे भारत एक्स्प्रेसला पर्यायी म्हणून वापरला जावा. तसेच कोकण रेल्वेच्या एकेरी मार्गावर लोकमान्य मडगाव एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस एवढ्या रेल्वेगाड्या एका मागोमाग एक हाताळणे शक्य होत नसल्यामुळे तेजस एक्स्प्रेस पूर्वीप्रमाणे करमळीपर्यंतच चालवल्यास मुंबईहून जाणाऱ्या रेल्वेगाडीला उशीर झाल्यास मुंबईकडे परतणाऱ्या गाडीला होणारा उशीर टाळता येईल. – अक्षय महापदी, सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती.