मुंबई : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने पनवेल ते सावंतवाडी रोड आणि मडगावसाठी १० अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सावंतवाडी रोडसाठी ८ आणि मडगावसाठी २ विशेष फेऱ्यांचा समावेश आहे.
गाडी क्रमांक ०१००७ विशेष गाडी ६ जूनपर्यंत प्रत्येक शनिवारी पनवेल येथून सायंकाळी ६.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१००८ विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून प्रत्येक शनिवारी सकाळी ७.२० वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता पनवेल येथे पोहोचेल. या रेल्वेगाड्यांना पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबे देण्यात आले आहेत. या विशेष रेल्वेगाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी डबा, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी इकॉनॉमी डबे, आठ शयनयान डबे, चार सामान्य द्वितीय श्रेणी डबे तसेच गार्ड ब्रेक व्हॅनसह एकूण विविध श्रेणींचे डबे असतील.
गाडी क्रमांक ०११०५ विशेष रेल्वेगाडी १८ मे रोजी पनवेल येथून पहाटे ५.४५ वाजता सुटून त्याचदिवशी सायंकाळी ६.१० वाजता मडगाव येथे पोहोचेल. तर, गाडी क्रमांक ०११०६ विशेषगाडी १७ मे रोजी मडगाव येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पनवेल येथे पोहोचेल. या रेल्वेगाड्यांना पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी येथे थांबे देण्यात आले आहेत. या विशेष रेल्वेगाड्यांमध्ये वातानुकूलित तृतीय श्रेणीचे तीन डबे, ११ शयनयान डबे आणि सात सामान्य द्वितीय श्रेणी डब्यांची सुविधा उपलब्ध असणार आहे. या सर्व रेल्वेगाड्यांचे विशेष शुल्कासह आरक्षण सुरू झाले असून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर, आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. अनारक्षित डब्यांचे तिकीट यूटीएस प्रणालीद्वारे उपलब्ध आहे, अशी माहिती मध्य रेल्वेद्वारे देण्यात आली.
