मुंबई : कोकण रेल्वेवर सातत्याने तिकीट तपासणी मोहीम सुरू असून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षात कोकण रेल्वेवर १.८२ लाख प्रवाशांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून १२.८१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.विनातिकीट प्रवाशांना आळा घालण्यासाठी आणि अधिकृत प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी प्रवास करता यावा यासाठी कोकण रेल्वे तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे.

एप्रिल ते सप्टेंबर २०२५ दरम्यान ५,४९३ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमांमध्ये विनातिकीट, अनियमित तिकीट प्रवाशांची १,८२,७८१ प्रकरणे आढळली. त्यामुळे रेल्वे तिकीट भाडे आणि दंड म्हणून १२.८१ कोटी रुपये वसूल करण्यात आले. केवळ ऑक्टोबर २०२५ मध्ये ९२० विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. त्यामध्ये ४२,६४५ विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आली. त्यांच्याकडून २.४० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.

सर्व प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी वैध तिकिटे खरेदी करावे, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे. योग्य तिकीट न घेता प्रवास करणे हा गुन्हा आहे. संपूर्ण मार्गावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून भविष्यात तिकीट तपासणी मोहीम सुरूच राहील, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.