मुंबई : राज्यातील अनेक भागात फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच कमाल तापमानात वाढ झाली. यामुळे अनेक भागात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या. मागील अनेक दिवसांपासून कोकण पट्ट्यात उष्ण तापमानाची नोंद होत आहे.
कोकण आणि विदर्भातील अनेक भागात शुक्रवारीही कमाल तापमान अधिक नोंदले गेले. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण पट्ट्यासह विदर्भातील काही भागात कमाल तापमान अधिक राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला.
मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामाना चढ-उतार होत आहे अनेक ठिकणी दुपारी उन्हाच्या झळा, तर पहाटे गारवा जाणवत आहे. पुढील चार दिवसांत कोकण पट्ट्यातील कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल आणि त्यांनतर हळूहळू घट होईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. या दरम्यान कोकण पट्ट्यातील कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक म्हणजेच ३४ ते ३५ अंश सेल्सिअस इतके राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला. रत्नागिरी येथे शुक्रवारी कोकण पट्टयातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. येथील कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअस इतके होते.
विदर्भातही कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला. शुक्रवारी विदर्भातील अनेक भागात कमाल तापमान अधिक होते. सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अमरावती येथे झाली. येथील कमाल तापमान ३५.६ इतके होते. तर अकोला, बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे कमाल तापमान अनुक्रमे ३५.३, ३३.६, ३५.२, ३३.२, ३३.२, ३३.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
दरम्यान, मुंबई आणि उपनगरातील उकाड्यातही वाढ झाली आहे. शुक्रवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३२.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३२.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईत शनिवारीही कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस इतके राहील अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
उष्ण व दमट हवामान कुठे ?
कोकण पट्ट्यातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे तर रविवार, १५ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामान राहणार असून या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. यादरम्यान किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

