मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून उष्ण आणि दमट हवामान कायम आहे. तसेच कमाल तापमानातही वाढ नोंदली जात आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात शुक्रवारी ३७.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यामुळे शहरातील उकाडा सातत्याने वाढत आहे. दरम्यान, शहरात शनिवारीही उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
मुंबईत मागील काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाली असल्याने उष्णतेचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत बाहेर फिरताना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. राज्यात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा, मेघगर्जना यासह पावसाची नोंद होत आहे. मुंबईत मात्र मागील काही दिवसांपासून उष्ण आणि दमट हवामान कायम आहे.
शहरातील किमान तापमानातही वाढ झाली असल्याने पहाटेच्या वेळी जाणवणारा गारवाही कमी झाला आहे. शनिवारी हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात २४.८ अंश सेल्सिअस, तर कुलाबा केंद्रात २४.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तसेच शुक्रवारी हवामान केंद्राच्या कुलाबा केंद्रात ३४.१ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ केंद्रात ३७. १ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. जे सामान्य तापमानाहून ३.७ अंशांनी अधिक होते.
तसेच शुक्रवारी ठाणे येथे ३९.५ अंश सेल्सिअस, रत्नागिरी ३५.४, डहाणू ३३.४ तर अलिबाग येथे ३४.३ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले. काही ठिकाणी जोरदार वाऱ्याचीही नोंद होत आहे. मुंबईसह कोकण प्रांतातील कमाल तापमानात वाढ झाली असल्याने नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
हवामान तज्ज्ञांचा इशारा काय?
राज्यात काही भागात कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. यादरम्यान मुंबईसह कोकण प्रांताततील काही भागात ३६ ते ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद होईल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, शनिवारी मुंबई शहरातील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील, अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. यावर्षी ‘एल निनो’ सक्रिय होण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे जागतिक तापमानात पुन्हा वाढ होऊ शकते, तसेच यामुळे तापमानाचे नवे विक्रम नोंदले जाऊ शकतात, असा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे.
